डिब्रूगढ तुरुंगात फोनची सुविधा नसल्याची तक्रार
वृत्तसंस्था/ अमृतसर
वारिस पंजाब दे या वादग्रस्त संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंह हा सहकारी कैद्यांसोबत आसाममधील डिब्रूगढ तुरुंगात उपोषण करत आहे. तर त्याची पत्नी किरणदीप कौरने देखील अमृतपालसोबत उपोषण करणार असल्याची घोषणा केली आहे. अमृतपालने पत्नीच्या माध्यमातून केंद्र तसेच पंजाब सरकारसमोर काही मागण्या ठेवल्या आहेत.
अमृतपालची भेट घेण्यासाठी मी दर आठवड्याला आसाममधील डिब्रूगढ तुरुंगात जाते. मागील गुरुवारी देखील आमची भेट झाली. त्यावेळी अमृतपाल सिंह समवेत त्याचे अन्य सहकारी उपोषण करत असल्याचे समजले. पंजाब सरकार डिब्रूगढ तुरुंगात अमृपाल आणि इतरांना टेलिफोनची सुविधा देण्याची अनुमती नाकारत असल्याचे किरणदीप कौरने म्हटले आहे. प्रत्यक्षात राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आल्यावर कैद्यांना कुटुंबीयांशी बोलण्याची मुभा दिली जात नाही.
टेलिफोनची सुविधा उपलब्ध करण्यात आल्यास दरवेळी भेटण्यासाठी खर्च करावे लागणारे 20-25 हजार रुपये प्रत्येक कुटुंबाचे वाचणार आहेत. प्रत्येक कुटुंब दर आठवड्याला 20-25 हजार रुपये खर्च करून आसाममध्ये जाऊ शकत नाही. फोनची सुविधा मिळाल्यास कुटुंबीय या कैद्यांची मानसिक स्थिती बरी राहू शकणार आहे. याचबरोबर फोनची सुविधा न मिळाल्याने वकिलांशी संपर्क साधता येत नाही. यामुळे या कैद्यांना स्वत:चे म्हणणे वकिलांपर्यंत पोहोचणे अशक्य ठरल्याचा दावा किरणदीप कौरने केला आहे.
तुरुंगात जेवणाची व्यवस्थाही चांगली नाही. तुरुंगात मिळणारे अन्न खाण्यायोग्य नसते. हे कैदी पंजाबी भाषिक आणि तुरुंगात कर्मचारी हे आसामी भाषा जाणणारे असल्याने त्यांच्यात योग्यप्रकारे संवाद साधला जात नाही. या कैद्यांना स्वत:चे म्हणणे मांडण्यासाठी कुठलाच अनुवादक उपलब्ध करवून देण्यात आलेला नाही. अशा स्थितीत दबावादरम्यान काही कैदी मानसिक त्रास सहन करत असल्याने त्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडत आहे. सरकारने लवकरात यावर तोडगा काढावा अशी मागणी किरणदीप कौरने केली आहे.









