कोल्हापूर :
शहरातील सुमारे 450 किलोमिटरचे रस्ते अमृत पाणी योजना आणि ड्रेनेज लाईनसाठी मागील चार वर्षात खोदले आहेत. मुख्य रस्त्यावरील खोदकामानंतर दुरुस्तीला एकतर पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, किंवा तीन–तीन वेळा काम करुनही दर्जा नाही. महापालिका प्रशासनाचे या कामावरील नियंत्रण सुटल्यानेच अमृत नाव असूनही ही योजना शहरवासीयांना विषासमान भासत आहे. शहरातील अनेक भागातील रस्त्यांची तर चाळण केली असून खरमाती, मुरूम, दगड आणि डांबर अशा चार प्रकारे दर्जेदार रस्त्यांची दुरुस्तीचा अजब प्रकार दिसून येत आहे.
रस्त्यांच्या दुरावस्थेची जबाबदारी निश्चित होत नाही तोपर्यंत खड्ड्यातून शहरवासीयांची सुटका होणार नाही. पेव्हर व हॉटमिक्स पध्दतीने केलेल्या रस्त्यासाठी एक वर्ष ते तीन वर्षापर्यंत डागडूजी करण्याची जबादारी ठेकेदाराची असते. मुदत आहे तोपर्यंतच रस्ते कसेबसे तग धरतात. किंवा मुदतीत खराब झाल्यास मलमपट्टी केली जाते. पावसाळा सुरू होण्यापूर्वी मे महिन्यात रस्त्यांचे सर्वेक्षण करुन डांबर–खडीचे योग्य मिश्रण घालून रोलींग करुन रस्त्यांची डागडूजी करणे गरजेचे आहे. मात्र तसे न होता, पावसाळा सुरु झाल्यानंतर माती मिश्रीत मुरूम टाकून पॅचवर्क करुन संपूर्ण शहर डर्टट्रॅक करण्यात यंत्रणा धन्यता मानत आहे. 2017 पासून पावसाळ्यानंतर शहरातील बहूतांश रस्ते वाहून जात आहेत. संबंधित ठेकेदारांनी माफीनामा देवून रस्ते पुन्हा करण्याची ग्वाही दिली जाते.
यंत्रणा आणि ठेकेदार यांच्या जोडगोळीने शहरातील काही रस्त्यांची वाट लागत असतानाच आता अमृत योजनेची भर पडली. शहरातील बहुतांश भागातील खोदाई आणि त्यानंतरचे रिस्टोरेशन दर्जेदार केलेलं नाही. महापालिकेने गल्ली बोळातील काही रस्त्यांची डागडूजी केल्याने अमृत योजनेतील खोदकाम आणि दुरुस्ती झाकली गेली. अनेक ठिकाणी मुरूम टाकून डागडूजी केली होती किंवा दर्जा न राखल्याने खोदाई केलेला भाग सखलात गेला आहे. दुरुस्ती केलेले रस्ते खचत आहेत. महापालिकेने विशेष मोहीम राबवून रस्त्यांची डागडूजी करण्याची गरज आहे.








