अमृतमहोत्सवी वर्षाचे स्वप्न अधुरेच : योजनेत खानापूर तालुक्मयातील 22 तलावांचा समावेश : पर्यटनाच्या धर्तीवर विकास करण्याची योजना
खानापूर : केंद्र सरकारने देशाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामीण भागातील तलावांचे सुशोभिकरण आणि खोलीकरण अशी अमृत सरोवर योजना जाहीर केली आहे. यातून गावोगावी तलाव विकसित करण्यात येणार आहेत. या अमृत सरोवर योजनेत खानापूर तालुक्मयातील 22 तलावांचा समावेश करण्यात आला होता. त्यातील आठ तलावांना सरकारने अनुदान मंजूर केले होते. मात्र या आठही सरोवरांचे काम अद्याप सुरू झाले नसल्याने अमृतमहोत्सवी वर्षाची सांगता 15 ऑगस्टला होणार आहे. मात्र वर्षभरात या अमृत सरोवरांचे भाग्य मात्र उजळलेले नाही. या अमृत सरोवर योजनेत कक्केरी, हलशी, कामशिनकोप, पारिश्वाड, लिंगनमठ, माणिकवाडी, तोपिनकट्टी, कणकुंबी अशा आठ गावांतील तलावांसाठी अनुदान मंजूर झाले होते. तालुक्यातील आठ तलावांची अमृत सरोवर योजनेखाली निवड करण्यात आली आहे. यात तलावातील गाळ काढून खोली वाढवण्यात येणार आहे. तसेच तलावांचे सुशोभिकरण करून या ठिकाणी पर्यटनाच्या धर्तीवर विकास करण्याची योजना आहे.
काही तलावांना निधी मंजूर
तालुक्यातील कक्केरी तलावासाठी 43 लाख, पारिश्वाड तलावासाठी 50 लाख, कामशिनकोप तलावासाठी 49 लाख 90 हजार, हलशीसाठी 49 लाख 15 हजार, लिंगनमठसाठी 46 लाख, माणिकवाडीसाठी 11 लाख, तोपिनकट्टीसाठी 49 लाख 70 हजार तर कणकुंबीसाठी 49 लाख 90 हजारचा निधी मंजूर झाला आहे. मात्र हे काम महात्मा गांधी रोजगार योजनेअंतर्गत करण्यात येणार असल्याने यासाठी निविदा काढून देखील कोणीही भरलेल्या नाहीत. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून अमृत सरोवराचे काम सुरुच झालेले नाही. परंतू काही तलावांची कामे रोहयोतून सुरू झाली आहेत.
निविदा भरण्यात कंत्राटदार नाराज
एकूण तालुक्मयातील आठ तलावांसाठी सध्या निधी मंजूर झाला आहे. मात्र तलावांच्या कामाचे कंत्राटदारांनी निविदाच न भरल्याने या अमृत सरोवराचे काम अद्याप सुरुच होऊ शकले नाही. जिल्हा पंचायतीकडून स्थानिक पातळीवर कंत्राटदारांना कंत्राट देण्यासाठीही प्रयत्न झाले होते. मात्र यालाही यश आले नाही. त्यामुळे या आठ अमृत सरोवरांचे काम रेंगाळलेले आहे. रोजगार हमी योजनेतून यासाठी प्रयत्न झालेले आहेत. मात्र अद्याप केंद्राच्या अमृत सरोवर योजनेच्या निर्देशानुसार तालुक्यातील एकाही तलावाचे काम पूर्ण झालेले नाही.
तलावांच्या ठिकाणी ध्वजारोहण
अमृत महोत्सवी वर्षाची सांगता होणारा 76 वा स्वातंत्र्य दिन या तलावांच्या ठिकाणी ध्वजारोहण करून करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. तसेच या तलावांना त्या भागातील शहीद जवानाचे नाव देवून त्या ठिकाणी दगडी पाटीवर नाव कोरण्याचे नियोजन आहे. तलावांची पूर्तताच झाली नाही. मात्र शासनाच्या बैजाक या संकेतस्थळावर आठ सरोवरे पूर्ण झाल्याचे दाखवण्यात आले आहे. त्या ठिकाणी 15 ऑगस्टनिमित्त ध्वजारोहण होणार असल्याने जि. पं. आणि रोजगार हमी योजनेच्या खात्यामार्फत नियोजन करण्यात आले आहे.









