बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना मान्यताप्राप्त,धारवाड विभागीय क्रिकेट संघटना आयोजित केएससीए धारवाड विभागीय सेकंड डिव्हीजन क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून आनंद अकादमी क्रिकेट ब ने विलास बेंद्रे संघाचा 129 धावांनी तर अमृत पोतदार सीसीआयने बेळगाव स्पोर्ट्स क्लब ब चा दोन गड्यांनी पराभव करुन प्रत्येकी 4 गुण मिळविले. अद्वैत साठे, स्वयम अप्पण्णावर यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आले.
केएससीए बेळगाव मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात आनंद क्रिकेट अकादमी ब ने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 गडी बाद 282 धावा केल्या. त्यात सुजय भूषण पी.ने 5 षटकार 6 चौकारांसह 69, सिद्धांत करडीने 1 षटकार 10 चौकारांसह 66, लाभ वेर्णेकरने 7 चौकारांसह 54, नागेंद्र पाटीलने 1 षटकार 5 चौकारांसह 30, केतज कोल्हापुरेने 2 षटकार 1 चौकारांसह 25 धावा केल्या. विलास बेंद्रेतर्फे शिवू एम. ने 48 धावांत 2 तर गुरुनाथ, शशांक, बसवराज व सुजय यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना विलास बेंद्रे संघाचा डाव 26.4 षटकात 153 धावांत आटोपला. त्यात कार्तिक के. ने 4 षटकार 7 चौकारांसह 59, गुरुनाथ जी. ने 6 चौकारांसह 35, सागर कम्मारने 18 तर शशांक कोल्हापूरकरने 17 धावा केल्या. आनंदतर्फे अद्वैत साठेने 38 धावांत 5, सुधीर गवळीने 43 धावांत 2, केतज कोल्हापुरेने 35 धावांत 2, झिशान सय्यदने 1 गडी बाद केला.
दुसऱ्या सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 46.2 षटकात सर्व बाद 198 धावा केल्या. त्यात अशुतोष हिरेमठने 3 षटकार 17 चौकारांसह 115 धावा करुन दमदार शतक झळकविले. त्याला प्रथमेश मास्तमर्डीने 15 तर अर्णव नुगानट्टीने 13 धावा करुन सुरेख साथ दिली. अमृत पोतदार सीसीआयतर्फे किरणकुमार ए. ने 23 धावांत 4, पार्थ नयनने 30 धावांत 3 तर अमोघ नायकने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना अमृत पोतदार सीसीआयने 33.4 षटकात 8 गडी बाद 199 धावा करुन सामना दोन गड्यांनी जिंकला. त्यात स्वयम अप्पण्णावरने 2 षटकार 7 चौकारांसह 52, संदीप मुरारीने नाबाद 24, पार्थ नयन व अमोघ नायक यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबने ओमकार देशपांडेने 47 धावांत 4, सिद्धाप्पा पुजेरीने 37 धावांत 2 तर साई कारेकर व ध्रुव देसाईने 1 गडी बाद केला.









