नामफलक लावण्यासाठी ग्राम पंचायतींना सूचना, परिसर हिरवाईने नटणार : सरोवर परिसरात विविध प्रकारची 75 रोपे लावणार
बेळगाव : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त ग्रामीण भागात रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या अमृत सरोवरांवर तिरंगा फडकविण्यात येणार आहे. याबरोबरच स्वातंत्र्य महोत्सवाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरोवर परिसरात 75 विविध झाडांची रोपटी लावून हिरवाई निर्माण करण्यात येणार आहे. तर तलावांना वीर सैनिकांचे नाव देण्यात येणार आहे. या माध्यमातून देशाभिमान व पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात येणार आहे. यासाठी ‘माझी माती माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे.
रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील पाण्याची समस्या निकालात काढण्यासाठी अमृत सरोवर योजना राबविण्यात आली आहे. सदर विकासकामांची माहिती नागरिकांना व्हावी, तसेच पाण्याचे महत्त्व समजावे, यासाठी अमृत सरोवरांवर तिरंगा ध्वज फडकविण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याबाबत ग्राम पंचायतींना सूचना करण्यात आली आहे. यासाठी ‘माझी माती माझा देश’ हे अभियान सुरू करण्यात आले आहे. ग्राम पंचायतपासून ते तालुका पंचायत, जिल्हा पंचायत आणि राष्ट्रीय पातळीवर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. 9 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. त्यानुसार अमृत सरोवरांवर दि. 15 ऑगस्ट रोजी तिरंगा ध्वज फडकविण्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. याच दिवशी ग्रामस्थांच्या हस्ते अमृत सरोवर परिसरात उपलब्ध असणाऱ्या खुल्या जागेत 75 विविध प्रकारची रोपे लावून वनसंरक्षण व पर्यावरण संरक्षणाची माहिती दिली जाणार आहे. अशाप्रकारे हा संयुक्त उपक्रम राबविण्याचा निर्णय जिल्हा पंचायतकडून घेण्यात आला आहे.
स्वातंत्र्यासाठी अनेकांचे बलिदान
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. तर देशाच्या संरक्षणासाठी अनेक वीर सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. त्या सैनिकांचा गौरव व्हावा, त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम स्मरणात राहावी, या उद्देशाने हुतात्मा झालेल्या सैनिकांचे नाव तलावाला देण्याचा निर्णय जिल्हा पंचायतकडून घेण्यात आला आहे. त्याप्रमाणे ग्राम पंचायतींना अशा वीर सैनिकांची नावे देण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ग्राम पंचायतीच्या हद्दीत निर्माण करण्यात आलेल्या तलावाला गावातील हुतात्मा झालेल्या सैनिकांचे नाव दिल्यास त्यांचा गौरव होणार आहे. अशाप्रकारे पर्यावरण संरक्षण व देशासाठी बलिदान दिलेल्या वीर सैनिकांच्या स्मृती जागवल्या जाणार आहेत. या परिसराच्या देखभालीची जबाबदारी घेणाऱ्यांना मानपत्र देण्यात येणार आहे.
नामफलक उभारणार
ग्राम पंचायत व्याप्तीमध्ये हुतात्मा झालेल्या योद्ध्याच्या गौरवाच्या प्रित्यर्थ म्हणून योद्ध्यांच्या नावाचे नामफलक, त्यावर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे घोषवाक्य तसेच जगद्गुरु बसवण्णाचे वचन त्यावर लिहावे लागणार आहे. असा फलक उभारण्याची सूचना करण्यात आली आहे.
पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वसुधावंदन उपक्रम
पर्यावरणाच्या संरक्षणासाठीही वसुधावंदन उपक्रम राबविण्यात येणार आहे. विविध प्रकारची रोपटी तसेच वनौषधी एकूण 75 रोपटी लावण्यात येणार आहेत. सामाजिक, वनीकरण विभागाकडून रोपटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदर रोपट्यांचे संगोपन व रोपटी दत्तक घेण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्या रोपट्यांना दत्तक घेतलेल्यांची नावे देण्यात येणार आहेत.









