बहुतांशी अंगणवाड्यांच्या कार्यक्षेत्रात रेंजची समस्या : दिलेले सर्वच मोबाईल कुचकामी : कामकाज ऑफलाईन पद्धतीने
प्रतिनिधी /बेळगाव
बालकांना घडविणाऱ्या अंगणवाडीचा कारभार स्मार्ट करण्यासाठी अंगणवाडी शिक्षिकांना आणि कार्यकर्त्यांना स्मार्ट फोन देण्यात आला आहे. मात्र, बहुतांशी ठिकाणी रेंज नसल्याने हे स्मार्ट फोन कुचकामी ठरू लागले आहेत. त्यामुळे स्मार्ट अंगणवाडीतील कारभार स्मार्ट फोनविनाच सुरू असल्याचे दिसत आहे. विशेषत: ग्रामीण भागात रेंजची समस्या निर्माण झाल्याने स्मार्ट फोन वापराविना पडून असल्याचे दिसत आहेत.
जिह्यात 5531 अंगणवाड्या आहेत. या सर्व अंगणवाड्यांमध्ये स्मार्ट फोनचे वितरण करण्यात आले आहे. मात्र, बहुतांशी अंगणवाड्यांच्या क्षेत्रांमध्ये नेटवर्कची समस्या जाणवत असल्याने अंगणवाडीच्या कामात अडथळा निर्माण होत आहे. काही ठिकाणी अंगणवाडी शिक्षिकांना हा स्मार्ट फोन हाताळता येत नसल्याने तो वापराविना पडून आहे. त्यामुळे अंगणवाडी शिक्षिकांना मोबाईल फोन हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याची गरजही व्यक्त होऊ लागली आहे.
अंगणवाडी, सीडीपीओ, सुपरवायझर व अंगणवाडी साहाय्यिकांचे कामकाज सुरळीत आणि जलद करण्यासाठी मोबाईल देण्यात आले आहेत. अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची संख्या, हजर मुले, आहार सामग्री, गर्भवतींची माहिती हा सर्व डाटा ऑनलाईन पद्धतीने संग्रहित करण्याचे काम या फोनद्वारे केले जाते. मात्र, बहुतांशी अंगणवाड्यांच्या कार्यक्षेत्रांमध्ये रेंज नसल्याने ऑफलाईन पद्धतीनेच कारभार सुरू आहे. त्यामुळे शासनाने स्मार्ट फोनसाठी केलेला खर्च वाया गेला आहे.
जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांचा कारभार वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजण्यासाठी तो ऑनलाईन पद्धतीने सुरू केला आहे. मात्र, याला रेंजची समस्या भेडसावू लागली आहे. अंगणवाडीच्या फोन सेवेसाठी लाखो रुपये खर्ची घालण्यात आले आहेत. मात्र रेंजअभावी ऑनलाईन फोनचा कारभारही कुचकामी ठरताना दिसत आहे.
डोंगर भागातील गावांमध्येच रेंजची समस्या
जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्यांना मोबाईल स्मार्ट फोन देण्यात आले आहेत. काही ठिकाणी रेंजची समस्या आहे. मात्र, इतर ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने काम सुरू आहे. काही ग्रामीण आणि डोंगर भागातील गावांमध्येच रेंजची समस्या निर्माण होत आहे.
ए. एम. बसवराजू, सहसंचालक, महिला व बालकल्याण खाते









