गोकुऴ संघाला विनाकाऱण बदनाम केले जात आहे तसेच राजाराम कारखान्याचा निकालानंतर अखेर सत्याचा विजय झाला असून कारखान्याची फेरनिवडणूक लागावी यासाठी सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. तसेच राहूल गांधींची लोकप्रियता वाढत असून भाजप महत्वाच्या मुद्याला बगल देत इंडिया कि भारत असे मुद्दे जनतेसमोर मांडत असल्याची टिकाही त्यांनी केली.
कोल्हापूरात आज आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, “राजाराम कारखान्याचे 1272 सभासद अपात्र झाले हा अखेर सत्याचा विजय आहे. कारखान्याची फेर निवडणूक व्हावी यासाठी आपण सुप्रिम न्यायालयात अपिल करणार आहे.” असा खुलासा त्यांनी केला.
हेही वाचा >>> राजारामचा २१- ० चा पराभव बंटी पाटलांना अद्याप पचलेला नाही- अमल महाडिक
पुढे बोलताना ते म्हणाले, “भारत जोडो यात्रेला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. साडेचार हजार किलोमीटर राहुल गांधी चालले. या यात्रेवर अनेकांनी टीका केली. पण देशानेच नाही तर जगाने पाहिलं आहे की काँग्रेसला किती पाठींबा आहे. राहुल गांधी यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये आत्मीयता वाढत आहे. देशात बंधुभावाच वातावरण निर्माण व्हावं यासाठी राहुल गांधी प्रयत्न केले. भाजप नेहमीच द्वेषाचं राजकारण करत आलं आहे. गॅस 200 रुपयांनी कमी केलं आता पेट्रोल देखील कमी होईल. निवडणुका जवळ आल्या की असे दर कमी केले जातात. राहुल गांधी यांची देशात लोकप्रियता वाढली आहे. भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभुमीवरच कोल्हापूर जिल्ह्यात जनसंवाद यात्रा काढण्यात आली आहे.”असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “इंडिया आघाडीला प्रतिसाद चांगला मिळाला आहे. त्यामुळे ‘वन नेशन..वन इलेक्शन’ हा मुद्दा भाजपने उकरून काढला आहे. इंडिया आणि भारत असे विषय काढून महागाई सारखे मुद्दे मागे पाडले जातात. शिंदे- फडणवीस सरकारला राज्यात तिन्ही पक्षांचे को-ऑरडीनेशन करण्यात वेळ जात असल्याने निर्णय घेण्यासाठी यांना वेळच मिळत नाही. राज्यात पाऊस कमी झाला आहे, शेतकरी चिंतेत आहेत पण निर्णय घ्यायला सरकारला वेळ नाही.” असा आरोप त्यांनी सरकारवर केला.
नविन आघाडीवर भाष्य करताना आमदार सतेज पाटील म्हणाले, “इंडिया आघाडीत प्रागतिक पक्ष सहभागी झाले आहेत. शेकापचे जयंत पाटीलही उपस्थित होते. जयंत पाटील आणि राजू शेट्टी यांनी चर्चा सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना इंडिया आघाडीत यावी यासाठी आम्ही देखील शेट्टी यांच्याशी चर्चा करू. मराठा आरक्षणाच्या बाबतीत मूळ मुद्दा बाजूला पडेल असं सरकार करत आहे. काँग्रेस पक्ष हाच आपल्याला न्याय देईल अशी भावना नागरिकांत आहे. त्यामुळे नागरिक स्वतःहून या जनसंवाद यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. काँग्रेस बद्दल नागरिकांत विश्वासाचे वातावरण निर्माण झालं आहे त्यामुळेच CWC यादीत सर्वात जास्त तरुणांना संधी दिली आहे.” असे ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, “लोकसभेच्या निमित्ताने आम्ही प्रत्येक तालुक्यात ताकद किती आहे हे जाऊन पाहणार आहे. आमच्या कार्यकर्त्यांनी 2019 साली कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागा मागितल्या होत्या.”असा खुलासाही त्यांनी केला.
शौमिका महाडिक यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना ते म्हणाले, “गोकुळ दुध संघाला विनाकारण बदनाम केलं जातंय. दूध संघाचा अधिकृत दौरा होता त्यावेळी त्या का आल्या नाहीत. सभासदांची काय प्रतिक्रिया आहे ती लक्षात आली असती. निवडणुकीला अजून 3 वर्षे बाकी आहेत त्यावेळी सभासद ठरवतील.” असेही ते म्हणाले.









