पुणे- बेंगळूर महामार्गावर पुण्यातील नवले पुलाजवळ झालेल्या ट्रक आणि खासगी बसचा भीषण अपघातात एकूण चारजण मृत्युमुखी पडले त्यातील कोल्हापूरच्या 3 जणांचा समावेश आहे. तर एकूण 22 जण जखमी असून प्रवाशी गाढ झोपेत असताना मध्यरात्री दोनच्या सुमारास हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त खासगी बस कोल्हापूरहून मुंबईकडे जात पुणे- बेंगळूर महामार्गावरील नऱ्हे आंबेगाव परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ हा अपघात झाला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती खासगी बसला धडकली. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 22 जखमी झाले आहेत. मृतांपैकी तिघे कोल्हापूरचे असून जखमी लोकांमध्ये 3 कोल्हापूरातील रहिवाशांचा समावेश आहे.
मयतांमध्य़े रवींद्र वासुदेव कोरगावकर – वय ४६ आणि सुवर्णा वासुदेव कोरगावकर वय ८५, या दाजीपूरमध्ये राहणाऱ्या दोन व्यक्तींचा समावेश आहे. तर कोल्हापूरातील शास्त्रीनगरात राहणाऱ्या निशा प्रमोद भास्कर – वय ३६ यांचाही जागीच मृत्यू झाला आहे.
तर 22 जखमी लोकांपैकी आशीष प्रमोद भास्कर – ६, रा. शास्त्रीनगर, जयश्री अशोक देसाई – ५३, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर आणि स्मिता रामचंद्र जहागिरदार- ५२, रा. साने गुरुजी वसाहत या तिघांचा समावेश आहे.









