वृत्तसंस्था/ दुबई
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटीत भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या ताज्या ‘आयसीसी’ क्रमवारीत गोलंदाजांमध्ये पुन्हा अव्वल स्थान मिळविण्यास त्याला मदत झाली आहे. अनिर्णित चौथ्या कसोटीत 91 धावांत सहा बळी घेणारा आणि बॉर्डर-गावस्कर चषक मालिकेत 25 बळींसह आघाडीवर राहिलेला अश्विन इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनपेक्षा 10 रेटिंग गुणांनी पुढे आहे.
भारताचा डावखुरा फिरकी गोलंदाज अक्षर पटेल हाही सहा स्थानांनी चढून 28 व्या स्थानावर पोहोचला आहे. अश्विन आणि जडेजा हे आघाडीवर असलेल्या अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही तो चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. पाठीच्या दुखापतीतून सावरणारा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह गोलंदाजांमध्ये सातव्या क्रमांकावर घसरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील सर्वोत्तम कामगिरीमुळे भारतीय फलंदाज विराट कोहली सात स्थाने चढून 13 व्या स्थानावर पोहोचला आहे. अहमदाबाद येथील सामन्यात शतक झळकावलेला सलामीवीर शुभमन गिल 17 स्थाने झेपावत 46 व्या स्थानावर पोहोचला आहे. जखमी ऋषभ पंत (9 वे स्थान) आणि कर्णधार रोहित शर्मा (10 वे स्थान) हे अव्वल 10 मध्ये असलेले अन्य भारतीय फलंदाज आहेत.
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिशेल यांनीही या यादीत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ख्वाजा अहमदाबादमधील चौथ्या कसोटी सामन्यातील 180 धावांच्या खेळीमुळे दोन स्थाने चढून सातव्या स्थानावर आणि कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट 815 रेटिंग गुणांवर पोहोचला आहे. तर ख्राइस्टचर्चमध्ये श्रीलंकेवर विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचललेल्या मिशेलच्या 102 आणि 81 धावांच्या खेळींमुळे त्याला प्रथमच 800 गुणांच्या टप्प्याला स्पर्श करता आला असून कारकिर्दीतील आजवरचे सर्वोत्तम आठवे स्थान प्राप्त झाले आहे.









