वृत्तसंस्था /मुंबई
भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी मुंबईचा माजी कर्णधार अमोल मुजुमदारची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने ही घोषणा केली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये अमोल मुजुमदार, सुलक्षण नाईक, अशोक मलोत्रा आणि जतीन परांजपे यांच्या नावांची शिफारस क्रिकेट सल्लागार समितीने केली होती पण बीसीसीआयने यापदासाठी अमोल मुजुमदारची निवड एकमताने केली. यापूर्वी भारताचा माजी फिरकी गोलंदाज रमेश पोवार भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. गेल्या डिसेंबरमध्ये रमेश पोवार यांची या पदावरून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर जवळपास वर्षभराच्या कालावधीत भारतीय महिला क्रिकेट संघाला प्रमुख प्रशिक्षक मिळाला नव्हता. या कालावधीत ऋषीकेश कानिटकर आणि नुशीन अल खादीर यांची हंगामी प्रशिक्षक नियुक्ती केली होती. अमोल मुजुमदारने आपल्या 21 वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये 171 प्रथम श्रेणी सामन्यात 11 हजारपेक्षा अधिक धावा जमवल्dया असून त्यामध्ये 30 शतकांचा समावेश आहे. मुंबई रणजी संघाचे नेतृत्व मुजुमदारकडे होते. 48 वर्षीय अमोल मुजुमदार आता भारतीय महिला संघाच्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाठोपाठ कसोटी सामन्यात प्रशिक्षकपदाची जबाबदारी राहिल.









