ऑनलाईन टीम / तरुण भारत :
छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाटय़ाच्या प्रयोगाचे मोफत तिकीट द्या नाहीतर नाटक कसे होते ते बघतो, अशी धमकी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिल्याचा आरोप अभिनेते आणि खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे.
पिंपरीतील महानाटय़ाचा प्रयोग झाल्यानंतर त्यांनी स्वत: प्रेक्षकांसमोर येत ही घटना सांगितली आहे. अमोल कोल्हे म्हणाले की, प्रामाणिकपणे एक गोष्ट नमूद करू इच्छितो की, आतापर्यंत संभाजीनगर, नाशिक, निपाणी, कोल्हापूर, कराड या प्रत्येक ठिकाणी पोलीस बांधवांनी प्रचंड सहकार्य केलं. नाशिकमध्ये पोलीस आयुक्तांनी तर 2500 पोलीस बांधवांना त्यांच्या कुटुंबासह या महानाटकाचं तिकीट काढून दाखवलं.
पण पिंपरी-चिंचवड पोलीस याला अपवाद आहेत. मी अत्यंत खेदाची बाब तुमच्यासमोर शेअर करत आहे. नाटकाचं मोफत तिकीट द्या नाहीतर नाटक कसे होते ते बघतो, अशी धमकी येथील पोलीस बांधवांनी आमच्या कर्मचाऱ्यांना दिली. मी त्या पोलीस बांधवांचं नाव सांगणार नाही. कारण विरोध व्यक्तीला नाही, विरोध प्रवृत्तीला आहे. खाकी वर्दीचा मला प्रचंड अभिमान आहे. म्हणून मी पर्सनल पोलीस सिक्युरिटी गार्डसुद्धा घेत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.








