वृत्तसंस्था / बँकॉक
थायलंडचे माजी राष्ट्रप्रमुख थकसीन शिनावत्रा यांना शाही क्षमादान करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या कन्येला देशाच्या प्रमुखपदी विराजमान करण्यात आले आहे. त्यानंतर त्वरित हा क्षमादान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिनावात्रा हे थायलंडमधील अतिधनवानांपैकी एक आहेत. त्यांना अधिकाराचा दुरुपयोग केल्याच्या प्रकरणात त्या देशातील न्यायालयाने शिक्षा ठोठावली होती. तथापि, ते त्यानंतर विदेशात निघून गेले होते. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्ये ते पुन्हा थायलंडमध्ये नाट्यामयरित्या अवतीर्ण झाले. मात्र, ते परतल्यानंतर त्यांना 8 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. मात्र, ही शिक्षा या देशाचे सम्राट वाजीरालोंगकोर्न यांनी सात वर्षांनी कमी करुन 1 वर्षावर आणली होती. आता त्यांची ही शिक्षाही क्षमापित करण्यात आली आहे.









