काँग्रेसचे उपाध्यक्ष सुनील कवठणकर यांचा सवाल : सुलेमानच्या व्हिडीओतून अनेक प्रस्थांचा उल्लेख
पणजी : जमीन घोटाळा प्रकरणातील कुख्यात गुन्हेगार सुलेमान खानला पोलिस कोठडीतून पळून जाण्यास मदत करणारा आयआरबीचा पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याने आत्महत्येचा केलेला प्रयत्न हा सदर प्रकरणच कायमस्वऊपी मिटवून टाकण्याचा प्रकार आहे. नाईक याने भलेही आत्महत्येचा प्रयत्न केला असला तरी त्याला फिनाईल कुणी पुरविले? हा खरोखरच आत्महत्येचा प्रयत्न होता की त्याची हत्या करण्याचा प्रयत्न होता? या गोष्टींचा शोध घेण्यात यावा. त्याचबरोबर या प्रकरणात गुंतलेल्या आयपीएस अधिकाऱ्यासह एसपी क्राईम आणि अन्य पोलिसांची त्वरित बदली करावी व नवी टीम नियुक्त करावी, तसेच विशेष पथक नियुक्त करून या संपूर्ण घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस उपाध्यक्ष सुनिल कवठणकर यांनी केली आहे.
गुन्हा अन्वेषण विभागाच्या कोठडीत असलेल्या सिद्दीकी उर्फ सुलेमान खानला पळून जाण्यास मदत केल्यानंतर कॉन्स्टेबल अमित नाईक हा हुबळी पोलिसांना शरण आला होता. तेथून नंतर त्याला गोव्यात आणून कोठडीत डांबण्यात आले आहे. अशावेळी या संपूर्ण नाट्याचा सूत्रधार व माहितीचा एकमेव स्रोत असल्याने त्याला योग्य देखरेखीखाली ठेवणे पोलिसांचे कर्तव्य होते. तरीही पोलिस कोठडीत असताना शौचालयात जाण्याचे निमित्त करून तेथील फिनाईल प्राशन करून तो आत्महत्येचा प्रयत्न करतो, हे कसे शक्य आहे? असा सवाल कवठणकर यांनी केला आहे.
सदर प्रकरणी सखोल तपास चालू असल्याचे मुख्यमंत्री वारंवार सांगत असतात, परंतु आता त्यांच्याही सांगण्यावर कुणाचा विश्वास राहिलेला नाही, असा आरोप करत कवठणकर यांनी मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी रस्त्यांवरील खड्ड्यासंबंधी केलेल्या वक्तव्याचा दाखला दिला. एका संवेदनशील प्रकरणात अटक झालेला गुन्हेगार ज्या प्रकारे शाही पद्धतीने कोठडीतून बाहेर पडला तो सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओ जगभराने पाहिला आहे. त्यावेळीही आम्हाला हाच प्रश्न पडला होता व हे सर्व कारस्थान राजकीय आशीर्वादाशिवाय होऊच शकत नसल्याच्या शक्यतेवर शिक्कामोर्तब झाले होते, असे कवठणकर म्हणाले.
सुलेमान हा जमीन घोटाळ्यातील मास्टरमाईंड आहे. त्याचे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध होते हे हाती लागलेल्या काही व्हिडिओ क्लीपवरून स्पष्ट होत आहे. त्यात सुलेमानने ‘आपण स्वत: पळून गेलेलो नाही. तर आपण कोठडीतून बाहेर पडण्यापूर्वीच एक पोलिस टीम आधीच कनार्टकात पुढे गेली होती. नंतर दुसरी टीम गेली. त्यानंतर पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी आपणास कार्यालयात नेले व उपसभापती जोशुआ यांच्यासमक्ष मारहाण केली, असे सुलेमानने म्हटल्याचे कवठणकर यांनी सांगितले. त्याही पुढे तो पोलीस अधिकारी आपणाजवळ प्रॉपर्टी स्वत:च्या नावे करण्यासाठी दबाव टाकत होते, अन्यथा एनकाऊंटर करण्याची धमकी देत होते, असे सांगत असल्याचे कवठणकर म्हणाले.
सिद्धीकीने या व्हिडिओत पुढे सदर प्रकरणात स्वत: एसपीसह सुरज नामक उपअधीक्षक तसेच एसआयटीचे काही अधिकारी आणि स्थानिक गुन्हा शाखेतील काही अधिकारी गुंतले आहेत, असेही म्हटल्याचे कवठणकर यांनी सांगितले. यावरून राज्यात चाललेले जमीन घोटाळा प्रकरण हे भाजप, राजकारणी, पोलिस आणि भूमाफिया यांच्यातील नॅक्ससमध्ये ऊपांतरित होत असल्याचे स्पष्ट होत आहे. अन्यथा अशाप्रकारे एखाद्या गुन्हेगाराने थेट गुन्हा शाखेच्या कोठडीतून पलायन करण्याचे धाडस कुणीच करू शकत नाही. तसा प्रकार गोव्याच्या इतिहासात यापूर्वी कधी घडलेला नाही. तसेच गुन्हा शाखेच्या कोठडीत गुन्हेगाराला कधीच पूर्ण कपड्यांवर ठेवत नाही. परंतु सुलेमान मात्र पूर्ण कपड्यांसह सुटबूट घालूनच वावरत होता, असेही कवठणकर म्हणाले. हे सर्व पाहता ज्या प्रकारे कॉन्स्टेबलने सुलेमानला बाहेर काढण्याचे धाडस दाखविले आहे ते एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आदेशाशिवाय तो करूच शकत नाही, असा दावा कवठणकर यांनी केला. भरीस अमित नाईकने जो आत्महत्येचा प्रयत्न केला, त्यामागेही हेच अधिकारी असावे व त्यांनीच आत्महत्येस प्रवृत्त केले असावे, असा संशय कवठणकर यांनी व्यक्त केला आहे.









