तमिळ भाषेत द्या इंजिनियरिंग अन् वैद्यकीय शिक्षण
वृत्तसंस्था/चेन्नई
तामिळनाडूत राष्ट्रीय शिक्षण धोरणावरून मोठा वाद उभा ठाकला आहे. कथितपणे तिसरी भाषा म्हणून हिंदी लादण्याचा आरोप करत द्रमुक भाजपला लक्ष्य करू पाहत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि द्रमुक अध्यक्ष एम.के. स्टॅलिन यांच्या आरोपांना आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रत्युत्तर दिले आहे. स्टॅलिन यांनी आता राज्यात तमिळ भाषेत इंजिनियरिंग आणि वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करावे असे शाह यांनी म्हटले आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी स्टॅलिन यांच्यावर हिंदी भाषेवर भ्रम फैलावल्याचा आरोप केला आहे.
स्टॅलिन यांनी एलकेजीच्या विद्यार्थ्याकडून पीएचडीधारकाला लेक्चर देण्याचा प्रकार सुरू असल्याची उपरोधिक टिप्पणी स्टॅलिन यांनी केली होती. तसेच तामिळनाडुने राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अनेक उद्दिष्ट पूर्वीच प्राप्त केल्याचा दावा त्यांनी केला होता. भाषेच्या मुद्द्यावर आता स्टॅलिन यांच्यावर शाह यांनी निशाणा साधला आहे. नरेंद्र मोदी सरकारने अनेक बदल केलेआहेत. सीआयएसएफचे उमेदवार स्वत:च्या प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा देऊ शकतील हे मोदी सरकारने सुनिश्चित केले असल्याचे म्हणत शाह यांनी स्टॅलिन यांचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
स्टॅलिन यांना आवाहन
पंतप्रधान मोदी हे सर्व परीक्षा तमिळ भाषेत देता येतील हे सुनिश्चित करत आहेत. तामळिनाडूच्या विद्यार्थ्यांच्या लाभासाठी राज्यात तमिळ भाषेत इंजिनियरिंग आणि वैद्यकीय शिक्षण सुरू करण्याचे आवाहन मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना करत आहे असे शाह यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री शाह हे चेन्नईपासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावरील रानीपेटमध्ये आयोजित सीआयएसएफच्या 56 व्या स्थापना दिन सोहळ्यात सहभागी झाले होते.
राष्ट्रीय शिक्षण धोरणाला मिळतेय समर्थन
आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण समर्थक स्वाक्षरी अभियानाला तामिळनाडूत लोकांकडून मोठे समर्थन मिळाले आहे. आमच्या ऑनलाइन स्वाक्षरी मोहिमेला 36 तासांच्या आत 2 लाखाहून अधिक लोकांचे समर्थन मिळाले आणि आमच्या ऑन-ग्राउंड स्वाक्षरी अभियानाला पूर्ण तामिळनाडूत जबरदस्त समर्थन मिळत असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांनी केला आहे.









