केपेतून 800 ते 1 हजार लोकांची उपस्थिती : कवळेकर
वार्ताहर /केपे
केंद्रीय गृहमंत्री व भाजप नेते अमित शहा हे 16 रोजी गोव्यात येत असून फर्मागुडी-फोंडा येथील जाहीर सभेत ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत. केपे मतदारसंघात या सभेची जोरदार तयारी चालली असून त्याअनुषंगाने माजी उपमुख्यमंत्री व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत कवळेकर यांच्या बेतूल येथील निवासस्थानी सरपंच, पंच, नगरसेवक, प्रमुख कार्यकर्त्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी 200 ते 250 कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, जिल्हा पंचायत उपाध्यक्ष खुशाली वेळीप, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, भाजप मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, खोल सरंपच अजय पागी, फातर्पा सरपंच महेश फळदेसाई, बार्से सरपंच अर्जुन वेळीप, नगरसेवक चेतन हळदणकर, मोरपिर्लाचे माजी सरपंच खुशाली वेळीप, एसीटी मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, केपे महिला मोर्चा अध्यक्षा शीतल नाईक, उपसरपंच कृपेश वेळीप, उपसरपंच शिवन्या वेळीप, पंच कृष्णा वेळीप, देविदास वेळीप, मोहन गावकर, शाणू वेळीप, दिलीप वेळीप, पंढरी प्रभुदेसाई व इतर उपस्थित होते. यावेळी कवळेकर यांनी सांगितले की, केपे मतदारसंघाचा आजपर्यंतचा इतिहास पाहता पक्षाने जी जबाबदारी दिली त्यापेक्षा दुप्पट प्रतिसाद केपेतील जनतेने दिलेला आहे व ज्या ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या सदैव यशस्वीरीत्या पेलल्या आहेत. अमित शहा यांच्या जाहीर सभेसाठी पक्षाने केपेतून 500 लोकांच्या उपस्थितीचे लक्ष्य ठरविले होते. मात्र केपे मतदारसंघातून सुमारे 20 बसींची व्यवस्था केलेली असून कमीत कमी 800 ते 1000 लोक या सभेला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. या बैठकीत कार्यकर्त्यांना जबाबदारी वाटून दिल्याचे कवळेकर यांनी सागितले.









