25 हजारांची उपस्थिती अपेक्षित, अॅड.नरेंद्र सावईकर यांची माहिती
प्रतिनिधी/ पणजी
गोवा भाजपकडे असलेले आमदारांचे संख्याबळ तसेच लोकांचा मिळणारा पाठिंबा आणि प्रतिसाद पाहता 2024 मध्ये लोकसभेच्या दोन्ही जागा भाजपच जिंकेल, असा ठाम विश्वास सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी व्यक्त केला आहे.
पणजीत पक्षाच्या मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सिद्धार्थ कुंकळकर, तुळशीदास नाईक, सर्वानंद भगत आदींची उपस्थिती होती. या निवडणुकीची तयारी पक्षाने आतापासूनच सुरू केली असून त्याचाच धोरणात्मक भाग म्हणून गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज फर्मागुडी येथे भव्य अशा जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यावेळी सुमारे 25 हजार लोक उपस्थित राहतील, अशी अपेक्षा असून फर्मागुडीत प्रथमच एखाद्या सभेसाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोक जमणार आहेत, असे सावईकर म्हणाले.
गत निवडणुकीत 160 लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप अवघ्या मतांनी पिछाडीवर पडल्याचे लक्षात आहे. त्यात दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. त्याशिवाय अन्य काही कारणेही होती. अशा मतदारसंघांमध्ये गत वर्षभरापासून भाजपच्या कामांचा प्रारंभ झालेला आहे. गृहमंत्री अमित शहा यांचे सध्या विविध राज्यांचे दौरे सुरू असून गोवा भेट ही त्याचाच भाग आहे. जाहीर सभेत मार्गदर्शन केल्यानंतर ते पक्षाचे काम, निवडणूक तयारी यांचाही आढावा घेणार आहेत.
भाजपा कधीच कोणत्याही विरोधकास कमी लेखत नाही. गृहित धरत नाही. त्यामुळे प्रत्येक विरोधक हा आमच्यापेक्षाही सक्षम आहे, असे मानुनच आम्ही धोरणे ठरवत असतो. शहा यांची जाहीर सभा ही सुद्धा त्याच धोरणाचा भाग आहे, असे सावईकर म्हणाले.
फर्मागुडी येथे गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी 4 वाजता होणाऱ्या या सभेत व्यासपीठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, पक्षाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यासह पक्षाचे मंत्री, आमदार यांची उपस्थिती राहणार आहे. श्री. शहा यांचे दुपारी 3.15 वाजता गोव्यात आगमन होईल. त्यानंतर सर्वप्रथम ते पक्षाच्या संघटनात्मक कामांचा आढावा घेतील व नंतर 4 वाजता फर्मागुडी सभेत मार्गदर्शन करतील.
ही जाहीर सभा खास दक्षिण गोव्यासाठी असली तरीही राज्यभरातील लोकांनी त्यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन सावईकर यांनी केले.









