वृत्तसंस्था /नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 23-24 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते जम्मू आणि श्रीनगरमधील अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार असल्याची माहिती गुऊवारी दिली. शुक्रवारी सकाळी ते भारतीय जनसंघाचे संस्थापक श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून जम्मू-काश्मीर दौऱ्याची सुऊवात करतील. यानंतर ते सांबा येथे केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेची पायाभरणी करतील. तसेच शहरातील इतर अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन ते करणार आहेत. दुपारी ते श्रीनगरला रवाना होणार असून तेथे ते राजभवनात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील. सायंकाळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे आयोजित ‘वितस्ता’ महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी दिल्लीत परतण्यापूर्वी ते श्रीनगरमध्ये ‘बलिदान स्तंभा’ची पायाभरणी करणार आहेत.









