वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या हल्ल्यात जखमी झालेल्या आणि आपले जवळचे नातेवाईक गमावलेल्या पिडीतांची भेट घेतली आहे. त्यांनी प्रथम या हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. भारत दहशतवादासमोर झुकणार नाही. या हल्ल्याचा लवकरच प्रतिशोध घेतला जाईल, असे प्रतिपादन त्यांनी पिडीतांसमोर केले.
शहा यांना भेटताना पिडीतांच्या अश्रूंचा बांध फुटला. अक्षरश: रडत त्यांनी आपली व्यथा आणि तो भीषण प्रसंग शहा यांना कथन केला. शहा यांना भेटणाऱ्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. या मुलांनी आपले वडील या हल्ल्यात गमावले आहेत. शहा यांनी या मुलांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. थोडे दिवस थांबा. आम्ही या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊच, असा विश्वास त्यांनी दिला. प्रत्येक भारतीयाला या हल्ल्याची वेदना जाणवत आहे. हे दु:ख शब्दांमध्ये व्यक्त करता येण्यासारखे नाही. कोणत्याही स्थितीत आपले हे अश्रू वाया जाऊ दिले जाणार नाहीत. केंद्र सरकारवर आपण विश्वास ठेवा. आम्ही योग्य ती कारवाई केल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन अमित शहा यानी यावेळी केले.
पंतप्रधान मोदी भारतात परत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदी अरेबिया दौरा मध्येच सोडून भारतात आगमन केले आहे. आल्या आल्या त्वरित त्यांनी या हल्ल्यासंबंधी माहिती संरक्षण विभाग आणि गृह विभागाकडून मागविली. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडूनही माहिती घेतली आहे. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांनी काहीतरी मोठी योजना सज्ज केली आहे, अशी चर्चा होत आहे.
हल्लेखोरांचे रेखाचित्र प्रसिद्ध
मंगळवारी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यातील दहशतवाद्यांची रेखाचित्रे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. त्यांची संख्या चार असल्याचे समजून येत आहे. पहलगाम भागातील वनभागांमध्ये हे दहशतवादी कार्यरत असल्याचा संशय आहे. हल्ला केल्यानंतर ते पाकिस्तानात गेले असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पाकिस्तानचे कानावर हात
या हल्ल्याशी पाकिस्तानचा कोणताही संबंध नसल्याचा दावा त्या देशाने केला आहे. भारतात काहीही घडले, तरी जबाबदारी पाकिस्तानवर ढकलली जाते. या हल्ल्यात ज्यांना प्राण गमवावे लागले, त्यांच्या नातेवाईकांसंबंधी आम्हाला सहानुभूती आहे. तथापि, या हल्ल्याची योजना पाकिस्तानमध्ये तयार करण्यात आली, या आरोपात काहीही तथ्य नाही, असे प्रतिपादन त्या देशाच्या गृह विभागाने केले.
मुनीर यांच्या विधानांमुळे प्रोत्साहन
हा हल्ला होण्यापूर्वी दोनच दिवस आधी पाकिस्तानचे सेना प्रमुख असीम मुनीर यांनी पाकिस्तानातील एका कार्यक्रमात प्रक्षोभक भाषण केले होते. आम्ही हिंदूंपेक्षा वेगळे आहोत. आमचा धर्म, आमची संस्कृती, आमच्या सवयी, आमच्या परंपरा आणि आमची विचारसरणी हे सर्व हिंदूंपेक्षा वेगळे आहे. त्यामुळे आमची त्यांच्याशी तुलना होऊ शकत नाही. या भिन्नत्वामुळेच भारताची फाळणी होऊन पाकिस्तानचा जन्म झाला. हे भिन्नत्व प्रत्येक पाकिस्तानी नागरिकाने त्याच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचविले पाहिजे. जगाच्या पाठीवर कोठेही पाकिस्तानी मुस्लीम असला तरी त्याने पाकिस्तानचा जन्म कसा झाला आणि त्यासाठी आपल्या पूर्वजांनी कोणते कष्ट उठविले, यांची जाणीव पिढ्यानपिढ्या ठेवली पाहिजे. याच द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतावर पाकिस्तानची निर्मिती झाली असून हा द्विराष्ट्रवाद आजही अस्तित्वात आहे, अशा प्रकारचे अत्यंत चिथावणीखोर भाषण त्यांनी केले होते. याच भाषणातून प्रोत्साहन घेऊन हिंदूंना कमी लेखण्यासाठी हा हल्ला करण्यात आला आहे, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये होऊ लागली आहे. मुनीर यांचे भाषण हेच या हल्ल्याला कारणीभूत ठरल्याचे दिसत आहे.
रॉबर्ट वड्रा यांचे वादग्रस्त विधान
या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व देशाने एकत्र येऊन या हल्ल्याचा निषेध करण्याची आवश्यकता असताना, सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वड्रा यांनी वादग्रस्त विधान करुन या विषयात राजकारण घुसडण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रातील भारतीय जनता पक्षप्रणित सरकारने मुस्लिमांची कोंडी करण्याचे धोरण अवलंबिल्याने हा हल्ला झाला, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. हा हल्ला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केल्याचे स्पष्ट होत असताना वड्रा यांनी भारताशी याचा संबंध जोडला आहे. त्यामुळे सोशल मिडियावर त्यांना बरेच ट्रोल केले जात आहे. वड्रा यांच्या प्रतिक्रियेमुळे पाकिस्तानला बळ मिळाल्याची टीकाही आता केली जात आहे.
भाजपचा वड्रांवर घणाघात
भारतातील घटनांशी या हल्ल्याचा संबंध जोडून रॉबर्ट वड्रा हे पाकिस्तानाची बाजू भक्कम करीत आहेत, असा घणाघात भारतीय जनता पक्षाने केला आहे. हे काँग्रेसचे धोरण आहे. वड्रा यांचा प्रयत्न या घटनेचे गांभीर्य कमी करण्याचा आहे. या संबंधात संयमाने प्रतिक्रिया व्यक्त करण्याची आवश्यकता असताना, वड्रा यात राजकारण आणून मतपेटीचे राजकारण करु इच्छितात. त्यांचा हा प्रयत्न अत्यंत निंदनीय आहे, अशी टीका भारतीय जनता पक्षाने बुधवारी केली आहे.
गुन्हेगारांना शिक्षा व्हावी : मेहबुबा मुफ्ती
जम्मू काश्मीरमधील पीडीपी या पक्षाच्या नेत्या आणि या प्रदेशाच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्यांनी हल्ल्यात मृत झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली. सरकारने त्वरित या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.









