केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून महायुतीच्या प्रचारासाठी त्यांनी आज भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाटी घेतल्या. कोल्हापूरात त्यांनी आज सकाळी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन ते सांगली लोकसभेचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या प्रचारासाठी सांगलीला रवाना झाले.
कोल्हापूरच्या दोन्ही जागा नैसर्गिक न्यायाने आपल्या पारड्यात पाडून घेण्यास यशस्वी झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा घेतली. त्याच बरोबर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची इचलकरंजी येथे जाहीर सभा घेण्यात आली. महायुतीच्या शक्ती प्रदर्शनानंतर महाविकास आघाडीनेही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा कोल्हापूरातील गांधी मैदानावर घेतली.
दरम्यान, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी कोकणात भाजपचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेतली. त्यानंतर कोल्हापूरला भेट देऊन त्यांनी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराचा आढावा घेतला. आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सुचना आणि निर्देश दिले.
आज सकाळी अमित शहा यांनी करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या बरोबर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक हे सुद्धा उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, केंद्रिय गृहमंत्री अमित शहा हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज सकाळी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन सुचना दिल्या. कोल्हापूरातील दोन्ही उमेदवारांची भेट घेऊन त्यांनी प्रचाराचा आढावा घेतला. कोल्हापूरातील दोन्ही जागा या अधिक मताधिक्याने पुढे असल्याचंही त्यांनी सांगितलं.”असा खुलासा महाडिक यांनी केला.