वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज 42 वर्षीय अमित मिश्राने गुरूवारी येथे क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे. तब्बल 20 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीला अमित मिश्राने निवृत्तीच्या निर्णयाने पूर्णविराम दिला आहे. अमित मिश्रा हा हरियाणाचा क्रिकेटपटू असून त्याने आपला शेवटचा सामना 2017 साली खेळला होता. 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत त्याने आपला सहभाग दर्शविला होता. अमित मिश्राने दूरध्वनीद्वारे वृत्तसंस्थेला आपल्या निवृत्तीची माहिती दिली. वारंवार दुखापतीमुळे तसेच नव्या पिडीतील युवा क्रिकेटपटूंना योग्यवेळी संधी मिळावी या हेतुने अमित मिश्राने निवृत्तीचा निर्णय योग्यवेळी घेतला आहे.
अमित मिश्राने आपल्या 20 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत 22 कसोटी, 36 वनडे आणि 10 टी-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीत 76 गडी तर वनडे कारकिर्दीत 64 गडी बाद केले आहेत. 2008 साली ऑस्ट्रेलिया विरुद्ध अमित मिश्राने आपले कसोटी पदार्पण केले होते. 2003 साली अमित मिश्राने द. आफ्रिकेविरुद्ध आपले वनडे पदार्पण केले होते. 2024 च्या आयपीएल हंगामात त्याने लखनौ सुपर जायंट्सचे प्रतिनिधीत्व केले. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 535 बळी तसेच लिस्ट ए क्रिकेटमध्ये 252 आणि टी-20 सामन्यात त्यांनी 285 गडी बाद केले. आयपीएल स्पर्धेत त्याने 23.98 धावांच्या सरासरीने 166 गडी बाद केले आहेत. आयपीएलच्या इतिहासात तीन हॅट्ट्रीक नोंदविणारा अमित मिश्रा हा एकमेव गोलंदाज आहे.









