पण तेलही गेले, तूपही गेले, धुपाटणेही गेले
प्रतिनिधी/ पणजी
अट्टल गुन्हेगार आणि जमीन हडप प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्दिकी उर्फ सुलेमान खानला गुन्हा अन्वेषण विभागाच्या कोठडीतून पळून जाण्यास मदत करुन संपूर्ण पोलिस खात्याला कलंकीत करणारा कॉन्स्टेबल अमित नाईक याला बडतर्फ करण्यात आले आहे. आपल्याला कोठडीतून बाहेर काढून कर्नाटकात पोचविण्यासाठी सुलेमानने अमित नाईकला 3 कोटी ऊपये देण्याचे आमिष दाखविले होते. मात्र सिद्दीकी हुबळीत पोचल्यावर पसार झाला आणि अमित नाईकला पैसे मिळालेच नाही. त्यामुळे तेल गेले आणि तुपही गेले अशी स्थिती कॉन्स्टेबल अमित नाईक याची झाली आणि तो हुबळी पोलिसस्थानकात शरण आला. काल शनिवारी त्याला गोव्यात आणून त्याची कसून उलट तपासणी केली जात आहे.
तीन कोटींना भुलला अमित
ज्या कोठडीत सुलेमान होता त्या कोठडीत सीसीटीव्ही कॅमेरा आहेत, हे कॉन्स्टेबल अमित नाईकला माहीत होते. सुलेमानला सोडल्यानंतर पोलिस खात्यातून आपली हकालपट्टी होणार याचीही त्याला जाणीव होती. हे सर्व माहीत असतानाही त्याने तीन कोटींसाठी हे दृष्कृत्य केले. सुलेमानने त्याला आणखी कोणती आमिषे दाखविली होती काय, याबाबतही पोलिस तपास करीत आहेत.
पोलिसांची लक्तरे टांगली वेशीवर
पैशाला भुलूनच आपण सिद्दीकीला मदत केल्याचे कॉन्स्टेबल अमित नाईक याने सांगितले. जमीन हडप प्रकरणातील मुख्य संशयित सिद्दिकी उर्फ सुलेमान खान शुक्रवार 13 रोजी पहाटे रायबंदरच्या पोलिस कोठडीतून फरार झाला होता, त्याला कॉन्स्टेबल अमित नाईक याने बाहेर पडण्यास मदत केली आणि त्याला स्वत:च्या मोटरसायकलवरुन कर्नाटकात पोहोचवून पोलिस खात्याची लक्तरे वेशीवर टांगली.
आपण फसलो गेलो आहे, हे लक्षात आल्यानंतर अमित नाईक हुबळी येथे पोलिसांना शरण आला. या त्यानंतर त्याला गोवा पोलिसांनी गोव्यात आणले असून त्याची चौकशी सुरू आहे.
सिद्दीकी उर्फ सुलेमान खान मोकाट
पोलिस महासंचालक अलोक कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्दिकी खान कर्नाटकातच असून गोवा पोलिस, कर्नाटक पोलिसांच्या मदतीने ठिकठिकाणी छापेमारी करत आहे. मात्र त्यांना सिद्दीकी खान मिळालेला नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी स्वतंत्र टीम तयार केली, असून त्यांच्या मार्फत सर्व बाजूने चौकशी सुरू आहे.









