कारवाईनंतर ढसाढसा रडले : इस्पितळात दाखल, बायपास सर्जरी होणार
►वृत्तसंस्था/ चेन्नई
द्रमुकचे नेते आणि तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांना बुधवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. मंगळवारपासून त्यांच्या मालमत्तांवर टाकण्यात आलेल्या छाप्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने पोलीस आणि ईडीला बालाजी यांच्याविरुद्धच्या कथित ‘पॅश फॉर जॉब’ घोटाळ्याची चौकशी करण्याची परवानगी दिल्यानंतर ही कारवाई झाली आहे. अटकेदरम्यान बालाजी ढसाढसा रडू लागल्यानंतर काही वेळातच त्यांच्या छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांच्यावर उपचार सुरू असून बायपास सर्जरी करावी लागणार असल्याची माहिती वैद्यकीय बुलेटीनमध्ये देण्यात आली आहे.
सेंथिल बालाजी यांच्या घरावर मंगळवार, 13 जून रोजी ईडीने मनी लाँड्रिंगप्रकरणी छापा टाकला होता. सेंथिल यांच्या निवासाशिवाय करूर येथील त्यांच्या वडिलोपार्जित घरावरही छापे टाकण्यात आले आहेत. तसेच इतर मालमत्तांची व्यापक झडती घेतल्यानंतर वीज, उत्पादन शुल्क आणि दारूबंदी विभाग पाहणाऱ्या बालाजी यांना प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. सेंथिल बालाजी 2018 मध्ये द्रमुकमध्ये सामील झाले. 2011 ते 2015 दरम्यान झालेल्या नोकरी घोटाळ्यात पैसे घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्या काळात ते परिवहन मंत्री होते. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात सेंथिल यांच्यावरील आरोपांप्रकरणी पोलीस आणि ईडीला चौकशीला परवानगी दिली होती. त्यानंतर प्राप्तिकर विभागाने गेल्या महिन्यात राज्यात त्यांच्या निकटवर्तियांच्या घरांचीही झडती घेतली होती.
बायपास सर्जरी करणार
सेंथिल बालाजी यांची बुधवारी चेन्नईच्या तामिळनाडू सरकारी मल्टी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कोरोनरी अँजिओग्राम करण्यात आली. आता डॉक्टरांनी लवकरात लवकर बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने केलेल्या कारवाईदरम्यान छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना ऊग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सकाळी वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन जात असताना सेंथिल बालाजी यांना अश्रू अनावर झाले. बालाजी रुग्णवाहिकेत रडताना दिसले. याचदरम्यान त्यांचे समर्थक तपास यंत्रणेच्या विरोधात घोषणा देत होते.
सहकाऱ्यांची रुग्णालयात धाव
तामिळनाडूचे आरोग्यमंत्री एम सुब्रमण्यम आणि राज्याचे क्रीडा मंत्री उदयनिधी स्टॅलिन हे उपचार घेत असलेल्या ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांची भेट घेण्यासाठी दुपारच्या सुमारास चेन्नईतील सरकारी रुग्णालयात पोहोचले. यादरम्यान त्यांनी डॉक्टरांशीही चर्चा केली. त्यानंतर इस्पितळातून बाहेर पडताना त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सेंथिल बालाजी यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांच्यावरील आरोपांप्रकरणी कायदेशीर मदत घेतली जात असल्याचे उदयनिधी स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.
कुटुंबीयांची न्यायालयात धाव
ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्या पत्नी मेगला यांनी न्यायालयात हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करताना मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर शक्तिवेल यांनी खंडपीठातून माघार घेतली. तत्पूर्वी, सेंथिल बालाजीच्या कुटुंबासाठी उपस्थित असलेले वकील आर एलांगो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती एम सुंदर आणि आर शक्तीवेल यांचा समावेश असलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या प्रकरणाची दुपारी सुनावणी करण्याची तयारी दर्शवली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटकेपूर्वी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले नाही, तसेच कुटुंबीयांना अटकेबाबत माहिती दिली नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी केला आहे.









