जन्माष्टमी चषक 2023 चा विजेता
सेव्हन ज्युनिअर संघ ठरला स्पर्धेचा उपविजेता
सावंतवाडी येथील अमेय तेंडोलकर मित्रमंडळ आयोजित व बाबू सावंत पुरस्कृत जन्माष्टमी चषक 2023 स्पर्धेत अमेय स्ट्रायकर संघाने अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआऊटवर सेव्हन ज्युनिअर संघाचा पराभव करुन चषकावर आपले नाव कोरले. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रोख रु. 31 हजार व चषक अमेय स्ट्रायकर संघाला प्रदान करण्यात आला. तर उपविजेत्या सेव्हन ज्युनिअर संघाला रोख रु. 21 हजार व चषक देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक या राज्यांमधून अनेक नामवंत संघ सहभागी झाले होते. दि. 19 ऑगस्ट रोजी पहिल्या दिवशी झालेल्या सामन्यात टिन टिन वाळपई संघाचा पराभव करुन अमेय स्ट्रायकर संघाने फायनल मध्ये धडक मारली. तर दुसऱया दिवशी सेव्हन ज्युनिअर संघाने बाबूचे चॅलेंजर्स संघावर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला. अंतिम सामन्यात अटीतटीच्या व रोमहर्षक ठरलेल्या सामन्यात तब्बल 9 पेनल्टी शूटआऊटमध्ये अमेय स्ट्रायकर संघ विजयी झाला. या स्पर्धेत उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून सेव्हन ज्युनिअर संघाचा दिगंबर याला चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट खेळाडू म्हणून सेव्हन ज्युनिअर संघाचा शुभम व अमेय स्ट्रायकर संघाचा विवेक या दोन खेळाडूंना चषक देवून गौरविण्यात आले. या स्पर्धेत गोल्डन बुटचा मानकरी अमेय स्ट्रायकर संघाचा खेळाडू आहे. या सामन्यामध्ये रितेश पार्सेकर, युवराज तारी, सिध्दार्थ परवार यांनी पंच म्हणून काम पाहिले तर समालोचन सचिन सावंत व दिप आरोंदेकर यांनी केले.