अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांच्या हट्टाग्रहामुळे महासत्तेचे जगातील देशांशी असलेले संबंध मागच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बिघडले आहेत. ट्रम्प यांच्या पुढाकारातून विविध देशांवर अव्वाच्या सव्वा टॅरिफ लादण्यात आले असून, भारतावर तर तब्बल 50 टक्के टॅरिफचा अधिभार टाकण्यात आला आहे. अमेरिकेच्या या अनर्थकारणामुळे या देशाच्या तिजोरीतील परकीय गंगाजळी वाढली असली, तरी यातून अमेरिकेत महागाई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. याशिवाय या निर्णयामुळे अमेरिकेतील नागरिकांना दारिद्र्याशी सामना करावा लागणार असल्याचा निष्कर्ष येल युनिव्हर्सिटीच्या ताज्या अहवालात काढण्यात आला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठी टॅरिफ वाढ इतर देशांवर लागू केली आहे. तथापि, तेवढ्यावरही या महाशयांचे समाधान झाले नसून, आणखी अतिरिक्त कर लादण्याची भाषा ट्रम्फ करताना दिसतात. तथापि, अमेरिकेच्या एकूणच अर्थकारण व जीवनमानावर याचा मोठा परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. टॅरिफ धोरणामुळे 2026 पर्यंत अमेरिकेत सध्या अस्तित्वात असलेल्या गरिब नागरिकांमध्ये तब्बल 8 लाख 75 हजार इतक्या अतिरिक्त नागरिकांची भर पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामध्ये साधारणपणे 3 लाख 75 हजार इतकी लहान मुले असू शकतात. मुख्य म्हणजे या धोरणाचा सर्वाधिक फटका हा या देशातील अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना बसणार आहे. या गटातील नागरिक आपल्या उत्पन्नाचा मोठा भाग हा रोजच्या वापरातील वस्तूंच्या खरेदीकरिता खर्च करत असतात. त्याचबरोबर याच गटातील लोक मोठ्या प्रमाणात विदेशातून आयात झालेला मालही खरेदी करतात. हा माल तुलनेत स्वस्तात मिळतो. त्यामुळे तो विकत घेणे त्यांना परवडते. परंतु, टॅरिफ धोरणामुळे स्वस्तात मिळणारा हा माल आता कितीतरी पट महागला आहे. त्यामुळे हा माल विकत घेणे या वर्गास अवघड जाऊ लागले आहे. परिणामी लोकांच्या क्रयशक्तीला व पर्यायाने अर्थकारणाला याचा मोठा फटका बसला आहे. येल विद्यापीठाच्या बजेट लॅबच्या जॉन रिको यांनी टॅरिफ उत्पन्नावरील नव्हे, तर वस्तूवरील कर असल्याचे म्हटले आहे. बचतीपेक्षा उत्पन्नाचा अधिक भाग खर्च करणाऱ्यांना याचा फटका बसू शकतो. तसेच अमेरिकेतील गरिबी यामुळे 10.4 टक्क्यावरून 10.7 टक्क्यांपर्यंत वाढू शकते, अशी भीतीही व्यक्त केली आहे. ती अनाठायी ठरू नये. हे बघता ट्रम्प यांच्या उफराट्या धोरणांचे परिणाम भारतापेक्षा या देशालाच अधिक भोगावे लागण्याची शक्यता संभवते. म्हणूनच की काय मागच्या काही दिवसांत ट्रम्प यांचा सूर थोडासा बदलला आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्यांनी एक पोस्ट शेअर केली असून, भारताशी पुन्हा एकदा व्यापारविषयक चर्चा आणि वाटाघाटी करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे. खरे तर ट्रम्प हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले चांगले मित्र म्हणवतात. तथापि, एकीकडे मित्र म्हणायचे आणि दुसरीकडे मित्र देशावरच सर्वाधिक कर लादायचा, अशी त्यांची दुटप्पी नीती दिसते. पुढील आठवड्यात दोघांमध्ये चर्चा होणार असल्याचे स्वत: ट्रम्प यांनीच सांगितले आहे. शिवाय दोन्ही देशांना निष्कर्षापर्यंत जाण्यास कोणतीही अडचण येणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांच्या या भूमिकेला प्रतिसाद दिला आहे. दोन्ही देश नैसर्गिक भागिदार असल्याचे सांगून मोदी यांनी व्यापार व वाटाघाटीच्या चर्चेतून यशस्वी तोडगा निघण्याचा ााशावाद व्यक्त केला आहे. हे बघता मोदी व ट्रम्प यांच्यातील संवाद सकारात्मक होणार का आणि त्यातून व्यापारी कोंडी फुटणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी करतो. ही खरेदी भारताने थांबवावी, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. त्यासाठी भारतावर हा करबोझा चढविण्यात आला आहे. परंतु, भारताने याबाबतीत अमेरिकेला जुमानलेले नाही. तसेच यासंदर्भात देश माघार घेण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही. या पार्श्वभूमीवर अमेरिकेची भूमिका मवाळ होत असेल, तर तोदेखील त्यांच्या स्वार्थाचाच भाग म्हटला पाहिजे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, पुढच्या काही दिवसांत अमेरिकेच्या संरक्षण विभागाची एक टीम भारतीय अधिकाऱ्यांसोबत टेहळणी विमानांच्या विक्रीबाबत बोलणी करणार आहे. सुमारे 35 हजार कोटी ऊपयांचा हा करार असेल. खरे तर मागच्या महिन्यातच यावर चर्चा होणार होती. परंतु, टॅरिफमुळे यात व्यत्यय निर्माण झाले. परंतु, आता दोन्ही देशांमध्ये पुन्हा व्यापारी चर्चा सुरू झाली असून, त्यांच्यातील संबंध सुरळीत होण्याची शक्यता आहे. हे शुभचिन्हच म्हटले पाहिजे. अमेरिका आणि भारत हे जगातील दोन मोठे लोकशाहीप्रधान देश आहेत. जगातील अनेक सत्ता कोसळत असताना हे दोन देश येथील प्रगल्भ लोकशाहीमुळेच आजवर टिकून आहेत. अमेरिका ही आज जगातील क्रमांक एकची अर्थव्यवस्था आहे. तर भारतानेही चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. अशा दोन देशांमध्ये एकत्र व्यवहार, व्यापार असणे, हा त्या-त्या देशातील लोकांबरोबरच सबंध जगाच्या अर्थकारणालाही चालना देणारा भाग ठअतो. पण, हे लक्षात न घेता ट्रम्प यांच्यासारखे एककल्ली व कोणतेही अर्थभान नसणारे नेते जेव्हा अशा भूमिका घेतात, तेव्हा सगळ्या जगाचेच नुकसान होते. ट्रम्प यांनी अध्यक्षपदावरून आल्यापासून अनेक विचित्र निर्णय घेतले असून, त्याचा संपूर्ण विश्वाच्या अर्थकारणावर परिणाम होत असल्याचेदिसून येत आहे. आता ट्रम्प यांना उपरती आली किंवा ते मवाळ झाले, असे आपण गृहीत धरले, तरी त्यांचा एकूणच मूडी स्वभाव बघता भारतासह सर्वांनाच सावध भूमिका घ्यावी लागेल. ट्रम्प यांचा भर राष्ट्रहितापेक्षा स्वार्थकारणावर आहे. ते असेपर्यंत त्यांच्याशी थोडेफार जुळवून घ्यावे लागेल. बाकी ही ट्रम्पशाही फार काळ टिकणार नाही, एवढे नक्की.








