वृत्तसंस्था/ माँट्रियल
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या नॅशनल बँक महिलांच्या खुल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत अमेरिकेच्या 29 वर्षीय जेसिका पेगुलाने एकेरीची अंतिम फेरी गाठताना पोलंडच्या टॉप सिडेड इगा स्वायटेकला पराभवाचा धक्का दिला.
चौथ्या मानांकित पेगुलाने उपांत्य लढतीत स्वायटेकचा 6-2, 6-7(4-7), 6-4 असा पराभव केला. या सामन्यामध्ये पेगुलाने 11 वेळा स्वायटेकची सर्व्हिस तोडली. या स्पर्धेत पुरुष विभागात अमेरिकेच्या टॉमी पॉलने स्पेनच्या टॉप सिडेड अॅलकॅरेझचा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळवले होते. टेनिस क्षेत्राच्या इतिहासामध्ये एकाच आठवड्यात टॉप सिडेड पुरुष आणि महिला टेनिसपटूंना पराभव पत्करण्याची ही दुसरी खेप आहे. 2008 साली एप्रिल महिन्यात मियामी स्पर्धेत तत्कालिन टॉप सिडेड सेरेना विल्यम्सने जस्टीन हेनिनचा तसेच अँडी रॉडीकने रॉजर फेडररचा पराभव केला होता.