वृत्तसंस्था / चार्लस्टन
येथे सुरू असलेल्या चार्लस्टन खुल्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या जेसीका पेगुला आणि सोफिया केनीन यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.
उपांत्य फेरीच्या सामन्यात टॉपसिडेड पेगुलाने इक्टेरीना अॅलेक्सेंड्रोव्हाचा 6-2, 2-6, 7-5 अशा सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. हा उपांत्यफेरीचा सामना चुरशीचा झाला. या लढतीतील पहिल्या सेटमध्ये पेगुलाने सलग पाच गेम्स जिंकून पहिला सेट 6-2 असा काबीज केला. त्यानंतर मात्र दुसऱ्या सेटमध्ये रशियाच्या अॅलेक्सेंड्रोव्हाने पेगुलाची दोनवेळा सर्व्हिस भेदत हा सेट 6-2 असा जिंकून बरोबरी साधली. तिसरा सेट अपेक्षेप्रमाणे शेवटपर्यंत चुरशीचा झाला. पण पेगुलाने बेसलाईन खेळावर अधिक भर देत अॅलेक्सेंड्रोव्हाचे आव्हान संपुष्टात आणले. हा उपांत्य फेरीचा सामना 2 तास 21 मिनिटे चालला होता. 2025 च्या टेनिस हंगामातील पेगुलाचा हा एकेरीतील 24 वा विजय आहे. दुसऱ्या उपांत्य लढतीत पहिला सेट झाल्यानंतर अमंदा अॅनीसिमोव्हाने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतल्याने केनीनला अंतिम फेरीसाठी पुढे चाल मिळाली. उत्तर अमेरिकेतील चार्लस्टन टेनिस स्पर्धा ही महिलांच्या विभागातील सर्वात मोठी समजली जाते. या स्पर्धेत 1990 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या दोन खेळाडूंमध्ये एकेरीचा अंतिम सामना यावेळी होत आहे.
पुरुष-महिलांसाठी बक्षीसाची रक्कम समान
डब्ल्युटीए टूरवरील 500 दर्जाच्या महिलांच्या चार्लस्टन खुल्या टेनिस स्पर्धेत पुढील वर्षापासून (2026) पुरुष आणि महिला एकेरीतील विजेत्यांसाठी बक्षीसाची रक्कम समान राहिल, असे स्पर्धा आयोजकांनी घोषित केले आहे. पुढील वर्षांपासून या स्पर्धेचे सर्व हक्क क्रेडिट वन बँकने मिळविले आहेत. 1973 साली या स्पर्धेला प्रारंभ झाला. त्यावेळी महिला एकेरीच्या विजेतीला 1 लाख अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात येत असे. 2025 च्या चार्लस्टन खुल्या टेनिस स्पर्धेत एकूण बक्षीसाची रक्कम 1.06 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स असून पुढील वर्षी ही रक्कम 1.15 दशलक्ष डॉलर्स राहिल, असे घोषित करण्यात आले. क्लेकोर्टवर सदर स्पर्धा 9 दिवस खेळविली जाते. डब्ल्युटीए टूवरील ही प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते.









