2.17 कोटी रुपयांचे होते इनाम
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयने टॉप-10 मोस्ट वाँटेड गुन्हेगारांपैकी एक असलेली महिला गुन्हेगार सिंडी रोड्रिग्ज सिंहला भारतातून अटक केली आहे. सिंडी रोड्रिग्ज सिंह स्वत:च्या 6 वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणी वाँटेड होती. मोस्ट वाँटेड यादीत ती चौथ्या स्थानावर होती, अशी माहिती एफबीआयचे संचालक काश पटेल यांनी दिली आहे. 2022 मध्ये तिने स्वत:चा पुत्र नोएल रोड्रिग्ज अल्वारेजची हत्या केली होती आणि मार्च 2023 मध्ये तिने अमेरिकेतून पलायन केले होते. सिंडीला तिचा भारतीय वंशाचा पती अर्शदीप सिंह आणि 6 मुलांसोबत अखेरचे 22 मार्च 2023 रोजी भारतासाठी जात असलेल्या विमानात पाहिले गेले होते.
टेक्सासचे कायदा अंमलबजावणी अधिकारी, अमेरिकन न्याय विभाग आणि भारतीय अधिकाऱ्यांमधील समन्वयामुळे ही अटकेची कारवाई शक्य झाल्याचे वक्तव्य एफबीआयच्या संचालकांनी केले आहे. सिंडीला भारतीय अधिकारी आणि इंटरपोलच्या सहकार्याने भारतात अटक करण्यात आली आणि तिला अमेरिकेच्या अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहे. मार्च 2023 मध्ये अधिकाऱ्यांनी नोएलविषयी चौकशी केली होती. नोएल हा ऑक्टोबर 2022 पासून बेपत्ता होता, तर सिंडीने नोएल हा मेक्सिकोत स्वत:च्या जैविक पित्यासोबत असल्याचा खोटा दावा केला होता. याच्या दोन दिवसांनी सिंडी पती आणि 6 अन्य अल्पवयीन मुलांसोबत भारतात दाखल झाली होती. जुलै महिन्यात सिंडीचे नाव एफबीआयच्या मोस्ट वाँटेड यादीत जोडण्यात आले होते आणि तिच्याबद्दल माहिती देण्याकरता 2 लाख 50 हजार डॉलर्सचे इनाम जाहीर करण्यात आले होते. नोएलला अनेक आरोग्य समस्या होती, याचमुळे सिंडीने त्याची हत्या केली होती असे मानले जाते.









