वॉशिंग्टन डीसी / वृत्तसंस्था
अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था ‘नासा’ च्या अमेटिस-1 या चांद्रअभियानाअंतर्गत प्रक्षेपित करण्यात आलेले आरिऑन हे चांद्रयान आता चंद्राच्या अगदी जवळ पोहचले आहे. रविवारी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता ते चंद्राच्या पृष्ठभागापासून 130 किलोमीटर अंतरावर होते.
16 नोव्हेंबरला अमेरिकेतील फ्लोरिडा येथील प्रक्षेपण केंद्रावरुन या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. या प्रक्षेपणानंतर काही वेळातच ओरिऑन यानाची कॅप्सूल अग्निबाणापासून अलग होऊन चंद्राची दिशेने झेपावली होती. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घेत घेत हे वाहन चंद्राच्या कक्षेत पोहचणार होते आणि चंद्राभोवती प्रदक्षिणा करत ते चंद्राच्या अगदी जवळ प्रवास करणार आहे.
ही सर्व प्रक्रिया आता पूर्ण होत असली असून सर्व काही पूर्व निर्धारित कार्यक्रमानुसार झाल्यास येत्या एक दोन दिवसांमध्ये यान चंद्रापासून जास्तीत जास्त जवळ पोहचणार आहे. मात्र चंद्रावर उतरविले जाणार नाही. हे प्रायोगिक प्रक्षेपण आहे. 53 वर्षांनंतर पुन्हा अमेरिका चंद्रावर मानव उतरविण्याच्या प्रयत्नांमध्ये आहे. याच अभियानाचा भाग म्हणून हे यान सोडण्यात आले आहे. अर्मेटिस-2 आणि अर्मेटिस-3 अशी आणखी दोन प्रक्षेपणे या अंतर्गत होणार आहेत. अर्मेटिस-1 अंतर्गत ओरिऑन हे यान चंद्राच्या कक्षेत काही छोटे उपग्रह सोडणार असून नंतर स्वतःही चंद्राच्या कक्षेत प्रस्थापित होणार आहे. 2024 मध्ये अर्मेटिस-2 अंतर्गत काही अवकाशवीरही चंद्राच्या जवळपास पोहचतील. मात्र, ते चंद्रावर उतरणार नाहीत. त्यानंतर 2025 किंवा 2026 मध्ये अर्मेटिस-3 अंतर्गत काही अंतराळवीर प्रत्यक्ष चंद्रावर उतरणार आहेत, अशी माहिती देण्यात आली.









