अत्याधुनिक पाणबुडी पश्चिम आशियासाठी रवाना
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉयड ऑस्टिन यांनी पश्चिम आशियात गायडेड मिसाइल पाणबुडी पाठविण्याचा आदेश दिला आहे. याचबरोबर ‘युएसएस अब्राहम लिंकन’ विमानवाहू युद्धनौका ‘स्ट्राइक ग्रूप’ला वेगाने पश्चिम आशियासाठी रवाना होण्याचा निर्देश देण्यात आला आहे. तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माइल हानियेह आणि बैरूतमध्ये हिजबुल्लाह कमांडर फौद शुकरच्या हत्येनंतर मध्यपूर्वेत वाढलेला तणाव कमी करण्यासाठी इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधी करविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. हानियेह आणि शुकरच्या हत्येनंतर इराण आणि हिजबुल्लाहकडुन इस्रायलवर मोठे हल्ले होण्याची भीती ओ. याचमुळे अमेरिका पश्च़िम आशियात स्वत:ची सैन्य उपस्थिती वाढवत आहे.
अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन यांनी इस्रायलचे संरक्षणमंत्री योआव गॅलेंट यांच्याशी चर्चा करत इस्रायलच्या रक्षणासाठी शक्य ती सर्व पावले उचलण्याच्या अमेरिकेच्या प्रतिबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. गॅलेंट यांच्यासोबतच्या चर्चेत ऑस्टिन यांनी वाढत्या क्षेत्रीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियात अमेरिकेच्या सैन्यदलांची उपस्थिती आणि क्षमता मजबूत करण्यात येत असल्याचा उल्लेख केला. आशिया-प्रशांत क्षेत्रात असलेल्या ‘युएसएस अब्राहम लिंकन’ला मध्यपूर्वेत ‘युएसएस थियोडोर रुझवेल्ट’ विमानवाहू ‘स्ट्राइक ग्रूप’चे स्थान घेण्याचा आदेश यापूर्वीच देण्यात आला आहे.
एफ-35 लढाऊ विमान तैनात
युएसएस थियोडोर रुझवेल्ट पश्चिम आशियामधून लवकरच परतणार आहे. युएएस अब्राहम लिंकन चालू महिन्याच्या अखेरपर्यंत सेंट्रल कमांड क्षेत्रात पोहोचणार आहे. या विमानवाहू युद्धनौकेवर एफ-35 लढाऊ विमानांसोबत एफ/ए-18 लढाऊ विमाने तैनात आहेत.
अत्याधुनिक पाणबुडीची क्षमता
युएसएस जॉर्जिया निर्देशित मिसाइल सबमरीन लवकरच पश्चिम आशियात पोहोचणार आहे. आण्विक ऊर्जेने संचालित होणारी पाणबुडी दीर्घ पल्ल्यापर्यंत अचूक क्षेपणास्त्र हल्ला करण्यास सक्षम आहे. ओहायो श्रेणीच्या या पाणबुडी अमेरिकेच्या नौदलाच्या गुप्त तळापासून अभूतपूर्व हल्ला आणि विशेष मोहीम क्षमता प्रदान करतात. ओहायो क्लास पाणबुड्यांची लांबी 560 फुटांपेक्षा अधिक असते. तर त्यांचे वजन 18,750 टन असते. ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी पाणबुडी आहे.









