अमेरिकेसमोर न झुकल्याचा परिणाम : सैन्यतळासाठी बेटाची मागणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बांगलादेशातील हिंसेचा आगडोंब थांबण्याची चिन्हे नाहीत. हिंसेमुळेच माजी पंतप्रधान शेख हसीना यांना स्वत:चा देश सोडावा लागला होता. याचदरम्यान आता शेख हसीना यांनी मोठा खुलासा करत स्वत:चे सरकार पाडविण्यामागे अमेरिकेचा हात असल्याचे नमूद केले आहे. अमेरिकेने सेंट मार्टिन या बांगलादेशच्या बेटाची मागणी केली होती. परंतु अमेरिकेच्या दबावाला मी भीक घातली नव्हती. अमेरिका या बेटाच्या माध्यमातून बंगालच्या उपसागरात स्वत:चे वर्चस्व प्रस्थापित करू इच्छित होता असा आरोप शेख हसीना यांनी केला.
कट्टरवाद्यांच्या चिथावणीला बळी पडू नका
कृपा करून कट्टरवाद्यांच्या चिथावणीला बळी पडू नका अशी विनंती मी बांगलादेशच्या लोकांना करत आहे. मृतदेहांचा खच पहावा लागू नये म्हणून मी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. विरोधी पक्ष विद्यार्थ्यांच्या मृतदेहांच्या बळावर सत्तेवर येऊ इच्छित होते, परंतु मी असे घडू दिले नाही. सेंट मार्टिन बेट अमेरिकेला सोपविले असते अणि बंगालच्या उपसागरात प्रभुत्व मिळवू दिले असते तर मी सत्तेवर राहू शकले असते असा दावा शेख हसीना यांनी केला आहे. सेंट मार्टिन बेट केवळ 3 चौरस किलोमीटर आकाराचे असून ते बंगालच्या उपसागरात उत्तरपूर्व भागात स्थित आहे. हा बांगलादेशचा सर्वात दक्षिणेकडील भाग आहे.
तर मी आजही पंतप्रधान असते
मी देशात राहिले असते तर आणखी लोकांचा जीव गेला असता. बांगलादेशच्या लोकांसाठी मी स्वत:ला पदावरून हटविले. बांगलादेशचे लोक हीच माझी शक्ती होते, त्यांनाच मी नकोशी झाल्याने मी निघून जाणे योग्य मानल्याचे शेख हसीना यांनी म्हटले आहे.
लवकरच मायदेशी परतणार
स्वत:च्या पक्षाच्या सदस्यांना दिलेल्या संदेशात शेख हसीना यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. अवामी लीगने नेहमीच पुनरागमन केले आहे आणि अशा परिस्थितीतही आशा सोडू नका. मी लवकरच परतणार आहे. ज्या लोकांसाठी माझे पिता, माझ्या परिवाराने सर्वोच्च बलिदान केले, त्यांनीच माझ्यावर ही वेळ आणली असल्याचे शेख हसीना म्हणाल्या.









