हरनाझ संधूने चढवला ताज, भारताची दिविता राय उपांत्य फेरीनंतर बाहेर
न्यू ऑर्लिन्स / वृत्तसंस्था
अमेरिकेच्या आर बोनी गॅब्रिएल हिने ‘मिस युनिव्हर्स-2022’ होण्याचा बहुमान पटकावला. भारताच्या मिस युनिव्हर्स-2021 हरनाज संधूने तिला मुकूट प्रदान केला. मागील वर्षी हरनाज संधूने 12 डिसेंबर 2021 रोजी मिस युनिव्हर्सचा किताब जिंकला होता. मिस युनिव्हर्स 2022 स्पर्धेत व्हेनेझुएलाच्या अमांडा डुडामेलला स्पर्धेतील प्रथम उपविजेते म्हणून घोषित करण्यात आले. तर डोमिनिकन रिपब्लिकची अँड्रिना मार्टिनेझ ही दुसरी उपविजेती ठरली. भारताची दिविता राय उपांत्य फेरीत पोहोचल्यानंतर बाहेर पडली. नॅशनल कॉस्च्युम राऊंडमध्ये तिने सोनेरी पक्षी बनून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात 71 वी मिस युनिव्हर्स स्पर्धा पार पडली. जगभरातून आलेल्या 80 हून अधिक स्पर्धकांना पराभूत करून अमेरिकेच्या आर बोनी गॅब्रिएलने मुकुटावर कब्जा केला आहे. ही स्पर्धा अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स शहरात झाली. यामध्ये 25 वषीय दिविता रायने भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र, ती टॉप 5 मध्ये पोहोचू शकली नाही. संध्याकाळच्या गाऊन फेरीत ती बाहेर पडली. या स्पर्धेत जगभरातील 86 सौंदर्यवती सहभागी झाल्या होत्या.
भारताच्या दिविताची ‘टॉप 16’पर्यंत धडक

दिविता राय या भारतीय सौंदर्यवतीने टॉप 16 पर्यंत धडक मारली. राष्ट्रीय वेशभूषा फेरीत दिविताने ‘सोन चिरैया’ बनून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. एकेकाळी भारताला ‘सोनेरी पक्षी’ म्हटले जायचे. दिविताच्या या गोल्डन कलरच्या डेसने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची तीच प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. कर्नाटकची रहिवासी असलेली 25 वषीय दिविता राय व्यवसायाने मॉडेल आहे. तिने आर्किटेक्ट केले असून सध्या ती मुंबईत राहते. दिविताने 28 ऑगस्ट 2022 रोजी मिस दिवा युनिव्हर्स 2022 स्पर्धा जिंकली होती.









