चीनवरील अतिरिक्त शुल्क 90 दिवसांसाठी टाळले : पाकिस्तानची मागणी केली मान्य
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अतिरिक्त आयातशुल्क लादण्याच्या निर्णयाला पुन्हा एकदा 90 दिवसांसाठी टाळले आहे. अमेरिका-चीन शुल्क डेडलाइन 9 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्याच्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. तर यापूर्वी अमेरिका आणि चीनदरम्यान 11 मे रोजी जिनिव्हामध्ये व्यापार करार झाला होता. यात शुल्क वाढविण्याच्या निर्णयाला 90 दिवसांसाठी टाळण्यावर सहमती झाली होती. अमेरिकेने चीनवर सध्या 30 टक्के आयातशुल्क लादले आहे. तर ट्रम्प प्रशासनाने पुन्हा एकदा पाकिस्तानला झुकते माप देत बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना घोषित केले आहे. अमेरिका आणि चीनदरम्यान दीर्घ टॅरिफ वॉर चालले आहे. ट्रम्प यांनी चीनवर 245 टक्क्यांपर्यंत शुल्क लादण्याची धमकी दिली होती. तर चीनने प्रत्युत्तरादाखल 125 टक्के शुल्क लादणार असल्याचे म्हटले होते. परंतु जिनिव्हा येथील व्यापार करारानंतर हे शुल्क टाळण्यात आले होते.
चीनवर शुल्क लादणे कठिण : वेन्स
चीनवर अधिक शुल्क लादण्याचा निर्णय कठिण आणि नुकसानदायक ठरू शकतो. चीनवर शुल्क लादण्याचा विचार सुरू आहे, परंतु अद्याप कुठलाही ठोस निर्णय झालेला नाही असे अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितले आहे.
शुल्कवाढ झाल्यास चीनला फटका
चीनवर अमेरिकेच्या अत्याधिक शुल्काचा थेट प्रभाव त्याच्या निर्यात आणि उद्योगक्षेत्रावर पडण्याची शक्यता होती. चीन अमेरिकेला जवळापस 500 अब्ज डॉलर्सपेक्षा (43 लाख कोटी रुपये) अधिक मूल्याच्या सामग्रीची निर्यात करतो. अमेरिकेने वाढीव शुल्क लादण्याचा निर्णय घेतला असता तर चीनच्या जीडीपीत 1 टक्क्यांची घट झाली असती.
भारतावर अमेरिकेकडून अतिरिक्त शुल्क
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मागील आठवड्यात रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्याचे कारण देत भारतावर 25 टक्के अतिरिक्त शुल्क लादण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर भारतावरील एकूण आयातशुल्क 50 टक्के झाले होते. अतिरिक्त आयातशुल्क 27 ऑगस्टपासून लागू होणार आहे. रशियाकडून चीनच सर्वाधिक कच्च्या तेलाची आयात करतो, मात्र अमेरिकेने चीनवर अतिरिक्त शुल्क लादलेले नाही. चीनने दुर्लभ खनिजांचा पुरवठा रोखत नाक दाबल्याने अमेरिकेला त्याच्यासमोर झुकावे लागले असल्याचे चित्र आहे. चीनने यापूर्वी दुर्लभ खनिजांचा पुरवठा रोखत अमेरिकेला चांगलाच धडा शिकविला होता.
पाकिस्तानला केले खुश
अमेरिकेने बलूच लिबरेशन आर्मी (बीएलए) आणि त्याची सहकारी संघटना मजीद ब्रिगेडला विदेशी दहशतवादी संघटना घोषित केले आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री मार्को रुबियो यांनी सोमवारी रात्री उशिरा याची माहिती दिली. पाकिस्तानचे सैन्यप्रमुख आसीम मुनीर हे अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना हा निर्णय जाहीर झाला आहे. अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी बीएलएला दहशतवादी संघटना घोषित करण्यात यावे याकरता पाकिस्तान दीर्घकाळापासून प्रयत्न करत होता. बीएलए ही पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांताच्या स्वातंत्र्यासाठी लढत आहे. बलुचिस्तानच्या नैसर्गिक संपदेचे शोषण होत असून बलूच लोकांचे अधिकार पाकिस्तानने हिरावून घेतल्याचे बीएलएचे सांगणे आहे. बीएलएने पाकिस्तानी सैन्य, सरकार आणि चिनी प्रकल्पांना लक्ष्य केले आहे.









