अटकेवर मोठे बक्षीस जाहीर : संपत्तीही जप्त
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेवर अमेरिकेने 50 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 418 कोटींचे बक्षीस ठेवले आहे. मादुरो हे जगातील सर्वात मोठ्या नार्को तस्करांपैकी एक असल्याचा आरोप ट्रम्प प्रशासनाने केला आहे. मादुरो यांच्यावर ड्रग्ज तस्करांशी संगनमत करून फेंटानिल-मिश्रित कोकेन अमेरिकेत पाठवल्याचा आरोप आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने मादुरो यांची 700 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये दोन खाजगी जेट विमानांचाही समावेश आहे. 2020 मध्ये मॅनहॅटन फेडरल कोर्टात मादुरो यांच्यावर नार्को-दहशतवाद आणि कोकेन तस्करीचा कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. 2013 पासून व्हेनेझुएलामध्ये मादुरो सत्तेत आहेत. अमेरिका, युरोपियन युनियन आणि लॅटिन अमेरिकन देश त्यांच्यावर निवडणुकीत घोटाळा केल्याचा आरोप करत आहेत.
व्हेनेझुएला आणि अमेरिकेत अनेक दशकांपासून राजकीय मतभेद आहेत. व्हेनेझुएला अमेरिकेच्या भांडवलशाही आणि परराष्ट्र धोरणांवर टीका करतो, तर अमेरिका व्हेनेझुएलातील मानवी हक्कांच्या उल्लंघनांवर नाराजी व्यक्त करत आहे. सुमारे 100 वर्षांपूर्वी व्हेनेझुएलामध्ये तेलाचे साठे सापडले होते. तेलाच्या शोधानंतर केवळ 20 वर्षांनी व्हेनेझुएला जगातील सर्वात मोठ्या तेल निर्यातदार देशांपैकी एक देश बनला होता.









