तेलशुद्धीकरण प्रकल्पावर घातली बंदी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने इराणवरील दबाव वाढत चीनच्या एका तेलशुद्धीकरण प्रकल्पावर निर्बंध घातले आहेत. हा प्रकल्प हुतींशी निगडित जहाजांकडून जवळपास 50 कोटी डॉलर्सचे इराणी कच्चे तेल खरेदी करत होता. अमेरिकेच्या अर्थ मंत्रालयाने या निर्बंधांची घोषणा केली आहे. तर चीनने या कारवाईला विरोध दर्शविल आहे. अमेरिका चीन आणि इराणमधील सामान्य व्यापारात अडथळे निर्माण करत असल्याचे चीनने म्हटले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर कमाल दबाव निर्माण करण्याचे धोरण अवलंबित आहेत. याच्या अंतर्गत अनेक व्यक्ती आणि संस्थांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. यात इराणचे पेट्रोलियम मंत्री देखील सामील आहेत. तर चीनचा तेलशुद्धीकरण प्रकल्प इराणच्या शॅडो फ्लीट टँकर्सद्वारे कच्चे तेल मिळवित होता. यात हुती बंडखोर आणि इराणच्या संरक्षण मंत्रालयाशी संबंधित जहाज देखील सामील होते असा आरोप आहे. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाने एका चिनी कच्चे तेल टर्मिनलवरही निर्बंध लादले आहेत. इराणच्या कच्च्या तेलाची खरेदी इराणच्या राजवटीसाठी आर्थिक जीवनरेषा आहे. ही राजवट जगात दहशतवादाचा सर्वात मोठा समर्थक असल्याचे उद्गार अमेरिकेचे अर्थ मंत्री स्कॉट बेसेंट यांनी काढले आहेत.
अध्यक्ष ट्रम्प यांच्या कमाल दबाव अभियानाच्या अंतर्गत हे निर्बंध लादले जात आहेत. याचा उद्देश इराणची कच्च्या तेलाची निर्यात शून्य करणे आहे. इराण या तेलाच्या महसुलाचा वापर अमेरिकेच्या सहकाऱ्यांवर हल्ले आणि जगभरात दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी करत असल्याचा आरोप अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी केला.









