ट्रम्प यांच्या प्रशासनाला आशियात मोठा झटका
वृत्तसंस्था/ सोल
अमेरिकेचे दोन मित्र देश जपान आणि दक्षिण कोरियाने चीनसोबत 5 वर्षांमध्ये पहिल्यांदाच आर्थिक चर्चा केली आहे. या बैठकीत तिन्ही देशांनी व्यापाराला सुलभ करण्याच्या मागणीवर सहमती दर्शविली. ही बैठक अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यापारयुद्ध सुरू केल्यावर झाली आहे. ही बैठक ट्रम्प प्रशासनासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे, कारण चीनविरोधातील रणनीतित जपान आणि दक्षिण कोरिया हे अमेरिकेचे सर्वात मोठे सहकारी आहेत. परंतु ट्रम्प यांनी याची पर्वा न करता चीनसोबत जपान आणि दक्षिण कोरियावरही आयातशुल्क लादले आहेत. यामुळे त्रस्त झालेले जपान आणि दक्षिण कोरिया आता व्यापारासाठी नव्या सहकाऱ्यांचा शोध घेत आहेत.
बैठकीनंतर जारी एका वक्तव्यानुसार तिन्ही देशांच्या व्यापार मंत्र्यांनी ‘क्षेत्रीय आणि जागतिक व्यापाराला’ला चालना देण्यासाठी दक्षिण कोरिया-जपान-चीन मुक्त व्यापार करारा’वर एक ‘व्यापक आणि उच्चस्तरीय’ चर्चेसाठी दृढ सहकार्य करण्यावर सहमती व्यक्त केली आहे. आरसीईपीच्या अंमलबजावणीला मजबूत करणे आवश्यक ओ, ज्यात तिन्ही देशांनी भाग घेतला आहे आणि कोरिया-चीन-जपान मुक्त व्यापार कराराच्या चर्चेच्या माध्यमातून तिन्ही देशांदरम्यान व्यापार सहकार्याचा विस्तार करण्यासाठी एक रुपरेषा तयार करणे आवश्यक असल्याचे दक्षिण कोरियाचे व्यापारमंत्री आह्न डुक-ग्यून यांनी म्हटले आहे.
तिन्ही देशांमध्ये जुना वाद
ट्रम्प हे बुधवारी अमेरिकेची व्यापारी भागीदारी संपुष्टात आणणार आहेत, दक्षिण कोरिया, चीन आणि जपान हे अमेरिकेचे प्रमुख व्यापारी भागीदार आहेत, परंतु ते क्षेत्रीय वाद आणि फुकुशिमा आण्विक ऊर्जा प्रकल्पातून प्रदूषित पाणी सोडण्यासह अनेक मुद्द्यांवर परस्परांसोबत भांडत होते. जपान, चीन आणि दक्षिण कोरियाने 2012 मध्ये त्रिपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरु केली होती, परंतु यावर पुरेशी प्रगती झाली नाही.
ट्रम्प यांच्या शुल्कास्त्रामुळे सर्व देश त्रस्त
ट्रम्प यांनी मागील आठवड्यात कार्स आणि ऑटो पार्ट्सवर 25 टक्के आयातशुल्काची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे आशियाई वाहन निर्मात्यांना नुकसान पोहोचू शकते, या कंपन्यांकडून अमेरिकेला मोठ्या प्रमाणात वाहनांची निर्यात होते. मेक्सिकोनंतर दक्षिण कोरिया हा अमरिकेला वाहनांची निर्यात करणारा दुसरा सर्वात मोठा देश आहे, त्यानंतर जपानचा क्रमांक लागतो.








