तीन नौसैनिकांचा मृत्यू, 20 जण जखमी
वृत्तसंस्था / कॅनबेरा
ऑस्ट्रेलियात युद्धाभ्यासासाठी अमेरिकेच्या नौसैनिकांना घेऊन जाणारे अमेरिकेचे विमान कोसळून झालेल्या अपघातात 3 नौसैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. हिंदी महासागरात हा युद्धाभ्यास केला जात आहे. या अपघातात 20 सैनिक जखमी झाले असून साहाय्यता कार्य त्वरीत सुरु करण्यात आले आहे. रविवारी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेदहाच्या जवळपास हा अपघात झाला.
ऑस्ट्रेलियाच्या ‘संडे’ नामक बेटाजवळ हा अपघात झाला. विमानाचा भूकक्षाशी असणारा संपर्क तुटल्याने अपघात झाल्याचे मानण्यात येत आहे. या विमानात 20 सैनिक प्रवास करीत होते. त्यांच्यापैकी 17 जणांना वाचविण्यात यश आले. मात्र, ते जखमी असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या प्रशासनाने त्वरित आपली साहाय्यता पथके घटनास्थळी पाठविली आहेत.
जखमी अमेरिकेचेच
या अपघातात मृत आणि जखमी झालेले सर्व सैनिक अमेरिकेचेच आहेत. ऑस्ट्रेलियाच्या सैनिकांची कोणतीही हानी झालेली नाही. मात्र, ही घटना दु:खद असली तरी त्यामुळे युद्धसराव थांबणार नाही, असे प्रतिपादन ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानेस यांनी केले. घटनेची चौकशी करुन अपघाताचे कारण शोधले जाणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. या सरावात 150 अमेरिकन नौसैनिक भाग घेत आहेत. ऑस्ट्रेलियानजीच्या बेटांवर अमेरिकेचे सैनिकी तळ पूर्वीपासूनच असून तेथे नेहमी युद्धसराव चाललेला असतो. या क्षेत्रात सध्या चीनच्या हालचाली वाढल्याने अमेरिकेने आपल्या तळांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. ऑस्ट्रेलियानेही चीनच्या वाढत्या महत्वाकांक्षेला पायबंद घालण्यासाठी अमेरिकेशी सैनिकी सहकार्य वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.









