बांगलादेशातील घटना : भारतीय गुप्तचर संस्थांकडून चिंता व्यक्त
वृत्तसंस्था/ ढाका
बांगलादेशची राजधानी ढाका येथील एका हॉटेलमध्ये अमेरिकन स्पेशल फोर्सेस कमांडच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्यानंतर खळबळ उडाली. या अधिकाऱ्याचे नाव टेरेन्स आर्वेल जॅक्सन होते. भारतीय गुप्तचर संस्थांनीही या प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. ते या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहेत. तथापि, भारताने या प्रकरणावर कोणतीही अधिकृत टिप्पणी केलेली नाही. माध्यमांच्या वृत्तानुसार बांगलादेशच्या गुप्तचर संस्थांनी जॅक्सन अनेक महिने ढाकामध्ये होता आणि 29 ऑगस्ट रोजी वेस्टिन हॉटेलमध्ये राहिला होता असे म्हटले आहे. परंतु त्याच्या भेटीचा खरा उद्देश काय होता हे स्पष्ट नाही. पोस्टमॉर्टम किंवा चौकशीशिवाय त्याचा मृतदेह अमेरिकन दूतावासाकडे सोपवण्यात आल्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जॅक्सन बांगलादेशात कोणाला भेटला आणि तो कोणत्या ठिकाणी गेला हे गुलदस्त्यात आहे.
भारतीय गुप्तचर संस्थांनी जॅक्सनचा मृत्यू हा प्रादेशिक सुरक्षेसाठी एक गंभीर मुद्दा मानला आहे. भारतीय अधिकारी ढाकामध्ये जॅक्सन कोणाला भेटले आणि त्याच्या हालचाली काय होत्या यावर लक्ष ठेवून आहेत. बांगलादेशातील अलिकडच्या राजकीय बदलांमुळे आणि या प्रदेशात अमेरिकेच्या वाढत्या हालचालींमुळे भारताच्या चिंता आणखी वाढल्या आहेत.
जॅक्सन सुमारे 50 वर्षे वयाचा होता. तो मूळचा अमेरिकेतील उत्तर कॅरोलिना येथील रहिवासी असून त्याने 20 वर्षांहून अधिक काळ अमेरिकन सैन्यात सेवा बजावत अनेक युद्धांमध्ये भाग घेतला. जॅक्सन 2006 मध्ये सैन्यात सामील झाला होता आणि लवकरच निवृत्त होणार होता, असे एका भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले.









