भारतीय एनएसए अजित डोवाल यांनीही घेतली भेट
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जेक सुलिव्हन भारत दौऱ्यावर आले आहे. या दौऱ्यादरम्यान बुधवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल यांची भेट घेत चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दोन्ही बैठकांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.
पंतप्रधान मोदी पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यादृष्टीने सुरक्षा आढाव्याबाबत चर्चा झाल्याचे समजते. पंतप्रधान मोदींचा अमेरिका दौरा लक्षात घेऊन परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अमेरिकन एनएसएशी चर्चा केली. तसेच भारत-अमेरिका भागिदारीच्या दृष्टिकोनातून जागतिक धोरणात्मक घडामोडींवरही दोघांमध्ये चर्चा झाली.
पंतप्रधान मोदी यांची भेट
सुलिव्हन यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली होती. या भेटीत द्विपक्षीय सहकार्यामुळे विविध क्षेत्रात झालेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे आपले स्वागत करण्यास उत्सुक असल्याचेही सुलिव्हन यांनी मोदींना सांगितले. या भेटीत द्विपक्षीय, प्रादेशिक आणि परस्पर हितसंबंधांच्या जागतिक मुद्यांवर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्याशी फलदायी चर्चा अपेक्षित आहे.









