अजित डोवाल यांच्यासह विदेश मंत्र्यांशी चर्चा : ‘आयसीईटी’सह महत्त्वाच्या विषयांवर द्विपक्षीय बोलणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) जेक सुलिव्हन सोमवारी भारत दौऱ्यावर दाखल झाले. उप परराष्ट्रमंत्री कर्ट पॅम्पबेल हेसुद्धा सुलिव्हन यांच्यासोबत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीनंतर अमेरिकन अधिकाऱ्याची ही पहिलीच भारत भेट आहे. यादरम्यान त्यांनी ‘इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (आयसीईटी) च्या बैठकीला उपस्थिती दर्शवली. तसेच परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची भेट घेत त्यांनी काही पातळीवर द्विपक्षीय बोलणीही पूर्ण केली. याशिवाय अमेरिकन एनएसए सुलिव्हन यांनी भारतीय एनएसए अजित डोवाल यांची भेट घेतल्यानंतर दोन्ही बाजूंकडून संयुक्त निवेदन जारी करण्यात आले.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सोमवारी अमेरिकन समकक्ष जेक सुलिव्हन यांच्याशी सविस्तर चर्चा केली. या भेटीत त्यांनी प्रामुख्याने महत्त्वाकांक्षी ‘भारत-युएस इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज’ (आयसीईटी) च्या अंमलबजावणीवर चर्चा केली. ही बोलणी मुख्यत्वेकरून द्विपक्षीय संरक्षण संबंध आणि प्रादेशिक सुरक्षा परिस्थितीवर लक्ष केंद्रित करणारी होती. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुलिव्हन यांच्यासोबत सरकारचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग नेतेही अमेरिकन शिष्टमंडळात सहभागी आहेत. दोन्ही देशांच्या एनएसएनी प्रस्तावित भारत-मध्य-पूर्व-युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉरवर देखील चर्चा केल्याचे सांगण्यात आले.
द्विपक्षीय मुद्यांवरही चर्चा
डोवाल-सुलिव्हन यांच्यातील भेटीत द्विपक्षीय संबंधातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला. तसेच नवीन प्राधान्यक्रम सेट करण्यावरही भर दिला गेला. दोन्ही एनएसएनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्यांवर भारत-अमेरिका भागीदारीचा आढावा घेतला. आता मंगळवारी दोन्ही देशांचे एनएसए भारतीय उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या इंडस्ट्री सीईओंसह भारत-अमेरिका राउंडटेबलमध्ये सहभागींना संबोधित करतील.
सुलिव्हन यांनी घेतली परराष्ट्रमंत्र्यांची भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी इटलीच्या अपुलिया प्रदेशात जी-7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर संक्षिप्त चर्चा केल्यानंतर तीन दिवसांनी सुलिव्हन यांची भारत भेट झाली. बायडेन प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकाऱ्याने परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांचीही भेट घेतली. तसेच ते पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत. सुलिव्हन याआधी फेब्रुवारीमध्ये भारतात येणार होते, मात्र त्यावेळी त्यांना हा दौरा पुढे ढकलावा लागला होता. आता ते दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
आयसीईटी म्हणजे काय?
‘आयसीईटी’द्वारे भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश एआय, क्वांटम कॉम्प्युटिंग, 5जी-6जी, बायोटेक, स्पेस आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रात मजबूत संबंध प्रस्थापित करत आहेत. त्यामुळे शिक्षण आणि उद्योग वाढतील. प्रगत तंत्रज्ञानाच्या मुद्यावर सहकार्य वाढेल आणि हार्डवेअर क्षमतेत गुंतवणुकीच्या शक्मयता सुधारतील. येत्या काळात शैक्षणिक क्षेत्रात मोठे बदल घडवून आणणाऱ्या क्वांटम तंत्रज्ञानावर चर्चा होणार आहे. सेमीकंडक्टर उद्योगांना चालना देण्यासाठी संयुक्त रोडमॅप तयार करण्यावर एकमत होणे अपेक्षित आहे. या उपक्रमाद्वारे दोन्ही देश एकमेकांचे अनुभव शेअर करून अंतराळ तंत्रज्ञानामध्ये सहकार्य वाढवतील, अशी अपेक्षा आहे.









