वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
28 ऑगस्टपासून येथे सुरू होणाऱ्या 2023 च्या टेनिस हंगामातील शेवटच्या अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेचा ड्रॉ जाहीर करण्यात आला. या ड्रॉ नुसार स्पेनचा टॉप सिडेड कार्लोस अॅलकॅरेझची गाठ उपांत्यपूर्व फेरीत इटलीच्या सिनेरशी पडण्याची शक्यता आहे. सर्बियाचा द्वितीय मानांकित जोकोविचचा सलामीचा सामना अॅलेक्सझांडेर मुल्लेरशी होणार आहे.
विद्यमान अमेरिकन ग्रँडस्लॅम विजेता आणि टॉप सिडेड स्पेनचा अॅलकॅरेझ याचा सलामीचा सामना डॉम्निक कोपफेरशी होणार आहे. 2022 साली झालेल्या या स्पर्धेत सिनेर आणि अॅलकॅरेझ यांच्यात लढत झाली होती. त्याची पुनरावृत्ती यावेळी होण्याची शक्यता आहे. हार्डकोर्टवरील या ग्रँडस्लॅम स्पर्धेत टॉप सिडेड अॅलकॅरेझ दर्जेदार कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याचप्रमाणे रशियाचा 27 वर्षीय टेनिसपटू तृतीय मानांकित मेदव्हेदेवचा सलामीचा सामना बॅलेझशी होत आहे. 2021 साली मेदव्हेदेवने अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती. मेदव्हेदेव आणि रुबलेव यांच्यात उपांत्यपूर्व फेरीत गाठ पडेल असे वाटते.
आतापर्यंत 23 वेळा ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळवणारा तसेच तीनवेळा अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारा 36 वर्षीय जोकोविच याचा सलामीचा सामना फ्रान्सच्या मुल्लेशी होणार आहे. ग्रीसचा सित्सिपसचा सलामीचा सामना कॅनडाच्या मिलोस रवोनिकशी होणार आहे. नॉर्वेचा कास्पर रुड याची होल्गेर रुनेबरोबर उपांत्यपूर्व फेरीत लढत होईल असे वाटते.









