वॉशिंग्टन डीसी :
विख्यात अमेरिकन अर्थतज्ञ आणि जागतिक विषयांचे अभ्यासक एडवर्ड प्राईस यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या भारतासंबंधीच्या भूमिकेवर कडाडून टीका केली आहे. ट्रंप यांनी भारतावर लागू करण्यात आलेला 50 टक्के कर त्वरित मागे घ्यावा आणि भारताची क्षमायाचना करावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.
भारत हा अमेरिकेचा विश्वासू सहकारी आहे. गेले 25 वर्षे हे दोन्ही देश एकमेकांशी धोरणात्मक भागीदारीमध्ये आहेत. पण ट्रंप यांच्या आतताई धोरणामुळे भारत अमेरिकेपासून दुरावण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा परिणाम अमेरिकेच्याच हितांवर होणार आहे. त्यामुळे अमेरिकेने हा डोईजड कर काढून घ्यावा आणि भारताशी चर्चा करावी. भारतावर व्यापारी शुल्क लागू करायचे असेल तर ते सुसह्या ठेवावे, अशी सूचना त्यांनी केली.
पंतप्रधान मोदी मुत्सद्दी
प्राईस यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत ते जागतिक स्पर्धात्मकतेशी आणि जगातील बड्या प्रतिस्पर्धी देशांशी सुयोग्यपणे व्यवहार करीत आहेत. ते चाणाक्ष आहेत. भारत जगात एकटा नाही. तो केवळ अमेरिकेवर अवलंबून नाही. भारतासाठी इतर अनेक पर्याय आहेत, हे अमेरिकेला त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवून देण्याचे धोरण स्वीकारले आहे. अमेरिकेने योग्य तो संदेश घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.









