रिचर्ड ओल्सन विरोधात अमेरिकेत सुनावणी
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
2012-15 पर्यंत पाकिस्तानात अमेरिकेचे राजदूत राहिलेले रिचर्ड ओल्सन यांना पदाच्या गैरवापराप्रकरणी दोषी ठरवत शिक्षा सुनावली जाऊ शकते. त्यांच्या विरोधात अमेरिकेच्या एका न्यायालयात सुनावणी सुरू आहे. इस्लामाबादमधील नियुक्तीदरम्यान पाकिस्तानी महिला पत्रकार मोना हबीबसोबत अनैतिक संबंध राखल्याचा आरोप ओल्सन यांच्यावर आहे. तसेच मोना हबीबचा अमेरिकेतून जर्नालिजम कोर्स करविण्यात मदत करण्याचा आणि दुबईतील व्यावसायिकाकडून लाखो रुपयांचा हिऱ्यांचा हार स्वीकारल्याप्रकरणी ओल्सन हे आरोपी आहेत.
ओल्सन यांच्यावरील आरोपांचा खुलासा मागील आठवड्यात झाला होता. परंतु तेव्हा पाकिस्तानी महिला पत्रकाराचे नाव समोर आले नव्हते. आता पहिल्यांदाच पत्रकाराचे नाव उघड झाले आहे. ओल्सन यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट देत मोनासोबत विवाह देखील केला आहे.
अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेला 2011 मध्ये पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये अमेरिकेच्या कमांडोंनी ठार केले होते. यानंतर अमेरिका तसेच पाकिस्तानच्या संबंधांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. संबंध पुन्हा रुळावर आणण्यासाठी ओल्सन यांना पाकिस्तानात राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. परंतु आता त्यांच्या भ्रष्टाचार आणि विवाहबाह्या संबंधांच्या कहाण्या समोर येत आहेत.
सीआयएच्या अधिकाऱ्याला मोनाविषयी माहिती दिली हीत. दुबईतील व्यावसायिकाने हिऱ्यांचा हार माझ्या सासूला प्रदान केला होता. यामुळे याच्याशी माझे कुठलेच देणेघेणे नसल्याचा युक्तिवाद ओल्सन यांनी न्यायालयासमोर केला आहे. मोना हबीब आता ओल्सन सोबत न्यू मेक्सिकोत राहत आहे.
महत्त्वाच्या देशांमध्ये नियुक्ती
ओल्सन हे पाकिस्तानसोबत युएई, इराक आणि अफगाणिस्तान यासारख्या देशांमध्ये अमेरिकेचे राजदून राहिले आहेत. ओल्सन दोषी ठरल्यास त्यांना किमान 6 महिने तर कमाल 2 वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते. 34 वर्षांपर्यंत अमेरिकेच्या विदेश विभागात काम केल्यावर ओल्सन 2016 मध्ये निवृत्त झाले होते.









