वृत्तसंस्था / नवी दिल्ली
अमेरिकेने भारतावर 50 टक्के आयातशुल्क लागू केल्याने दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधात तणाव निर्माण झाला असतानाही एका अमेरिकन कंपनीनें भारतात मोठी गुंतवणूक करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. ही गुंतवणूक 8 हजार 800 कोटी रुपयांची आहे. या कंपनीचे नाव एली लिली लिमिटेड असे असून ही कंपनी विविध प्रकारांच्या औषधांची निर्मिती करते. ही कंपनी भारतात आपली उत्पादन केंद्रे स्थापन करणार आहे. यासमवेतच ही कंपनी भारतात हैद्राबाद येथे नवे संशोधन केंद्रही संस्थापित करणार आहे, अशी माहिती आहे.
भारतात औषधांचे संशोधन केंद्र स्थापन करण्याची कंपनीची योजना आहे. हे केंद्र कंपनीच्या भारतातील आणि भारताबाहेरील उत्पादन केंद्रांना तांत्रिक आणि तंत्रवैज्ञानिक साहाय्य पुरविणार आहे. ही विख्यात कंपनी असून तिने आपले उत्पादन केंद्र स्थापन करण्यासाठी भारताची निवड करावी, यावरुन भारताचे महत्व जगात किती वाढत आहे, याची कल्पना येते, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
महत्वाच्या औषधांची निर्मिती
या कंपनीकडे मधुमेह आणि स्थूलपणा घालविणारी औषधे निर्माण करते. भारतात सध्या मधुमेह आणि लठ्ठपणा या दोन समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. या कंपनीकडे या दोन्ही विकारांवर प्रभावी औषधे आहेत. त्यामुळे भारतातही या कंपनीला मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. ही दोन औषधे कंपनीने नुकतीच बाजारात आणली आहेत. त्यांना जगभरात मोठी मागणी आहे. भारत हे आमचे क्षमता निर्मिती केंद्र आहे, अशी भलावण कंपनीने केली आहे.
स्थानिकांशी भागीदारी करणार
भारतात केली जाणारी गुंतवणूक ही स्थानिक उद्योगांशी भागीदारीत केली जाईल. कंपनीच्या ज्या औषधांना जगात मोठी मागणी आहे, अशी औषधे भारतात निर्माण करण्यात येतील. भारताकडे मोठे टॅलेंट असून त्याचा उपयोग आम्हाला करुन घेता येईल, असा विश्वास या कंपनीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. लवकरच ही कंपनी भारतात गुंतवणुकीस प्रारंभ करणार आहे. या गुंतवणुकीमुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होऊ शकणार आहे.









