भारताला मिळू शकतो लाभ, दरवाजे उघडण्यासाठी योजना, उच्च तंत्रज्ञान येण्याची शक्यता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
उच्चतांत्रिक उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या अनेक अमेरिकन कंपन्या चीन सोडण्यासाठी सज्ज असल्याचे वृत्त आहे. चीनमधील वातावरण, चीनी स्थानिक कंपन्यांची चालविलेली जीवघेणी स्पर्धा, चीनचा घटता विकासदर आणि संशयास्पद राजकीय वातावरण यामुळे अमेरिकन कंपन्यांची चीनमध्ये कोंडी होत आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. त्यामुळे त्यांचा कल चीनमधून बाहेर पडण्याचा आहे.
या स्थितीचा भारताला लाभ होऊ शकतो. चीनमधून बाहेर पडणाऱ्या अमेरिकन कंपन्यांसाठी पायघड्या घालण्याची योजना केंद्र सरकारने सज्ज केली आहे. विशेषत: सेमीकंडक्टर, इतर इलेक्ट्रॉनिक साधने, औषधे, पर्यावरणस्नेही ऊर्जानिर्मिती इत्यादी क्षेत्रामध्ये वेगाने विकास साधण्याची भारताची महत्वाकांक्षा आहे. त्यामुळे अमेरिकन कंपन्या भारतात आल्यास भारतातील उच्चशिक्षित युवावर्गाला भारतातच सन्मानीय नोकऱ्या किंवा व्यवसाय करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. चीन सोडू इच्छिणाऱ्या अमेरिकन कंपन्यांपैकी 40 टक्के कंपन्या भारताकडे आकृष्ट होऊ शकतात, अशी स्थिती असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.
सर्वेक्षणाचा निष्कर्ष उत्साहवर्धक
1980 च्या दशकात अनेक मोठ्या अमेरिकन कंपन्या चीनमध्ये येण्यास प्रारंभ झाला होता. चीनने त्यांना अमेरिकेतसुद्धा नसतील अशा सवलती आणि सुविधा देऊ केल्या होत्या. चीनमध्ये कामगारवर्गही स्वस्तात उपलब्ध होता. साहजिकच अमेरिकन कंपन्यांना तेथे वस्तूनिर्मिती करणे आणि त्या वस्तूंची विक्री जगाच्या बाजारांमध्ये करणे शक्य झाले होते. तथापि, आता चीनची परिस्थिती वेगळी आहे. यासंबंधी नुकतेच एक सर्वेक्षण घेण्यात आले आहे. या सर्वेक्षणात सहभागी कंपन्यांपैकी 47 टक्के कंपन्या चीन सोडण्यासाठी उत्सुक आहेत. या कंपन्या आता पुढची केवळ पाच वर्षे चीनमध्ये व्यवसाय करु इच्छित आहेत. चीनमध्ये असलेल्या अमेरिकन कंपन्यांपैकी केवळ काही कंपन्यांच लाभात आहेत. इतर कंपन्यांना मंदीने ग्रासले असून त्यांच्या नफ्यात विक्रमी घसरण झाली आहे.
अमेरिका-चीनमध्ये व्यापारी तणाव
अमेरिका आणि चीन यांच्यात सध्या व्यापारी तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांनी आता हात आखडता घेण्यास प्रारंभ केला आहे. 2023 च्या आर्थिक वर्षात चीनमध्ये होणाऱ्या अमेरिकन कंपन्यांच्या गुंतवणुकीत 14 टक्के घट झाली असून ही गुंतवणूक 163 अब्ज डॉलर्सपर्यंत घसरली आहे. मध्यंतरीच्या काळात चीनने त्याच्या देशात बनणाऱ्या अमेरिकन विद्युत वाहनांवर 100 टक्के, सेमीकंडक्टर आणि सौर सेल्सवर 50 टक्के आणि लिथीयम आयन बॅटरीजवर 25 टक्के शुल्क आकारण्याची घोषणा केली होती. मात्र, अमेरिकेच्या दबावामुळे दोन वेळा हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला. तथापि, त्यामुळे अमेरिक कंपन्यांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले.
भारताला संधी
चीनमधून बाहेर पडणाऱ्या कंपन्यांपैकी अनेक भारतात येऊ शकतात. त्यांनी तशी चाचपणी चालविली आहे. भारतात आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम वेगाने लागू केल्याने खासगी क्षेत्रासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. पायाभूत सुविधांचा विकासही गेल्या 10 वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. वीजनिर्मितीच्या संदर्भात भारताची कामगिरी सुधारली आहे. परिणामी, अधिकाधिक कंपन्या येत्या 5 ते 10 वर्षांमध्ये भारतात येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
आव्हानेही मोठी
भारतासमोर आव्हानेही मोठी आहेत. अमेरिकन कंपन्यांनी भारतात मोठी गुंतवणूक करावयाचा निर्णय घेतल्यास भारतातील कामगार कायदे, कार्यसंस्कृती आणि आणखी आवश्यक मूलभूत सुधारणांमध्ये अधिक प्रभावीपणा आणण्याची आवश्यकता आहे. धोरण सातत्य हा भागही महत्वाचा मानला गेला आहे. उद्योगांना कच्चा माल अखंडितपणे करण्यासाठी योजना करावी लागणार आहे. तसेच राजकीय मतभेदांवरही तोडगा काढावा लागणार आहे. पण एकंदरीत, भारताची भरभराट होण्याची संधी आहे, असे निश्चितपणे मानण्यात येत आहे.
अमेरिकन कंपन्या का कंटळल्या ?
ड चीनमधील वातावरण आता पहिल्यासारखे अनुकूल नसल्याचा अनुभव
ड भारतात आर्थिक सुधारणांमुळे अनुकूल स्थिती निर्माण होण्यास प्रारंभ
ड इंग्रजी समजणाऱ्या उच्चशिक्षित युवावर्गाची भारतात सहज उपलब्धता
ड सेमीकंडक्टर आणि इतर उच्चतांत्रिक उत्पादनांसाठी भारताची योजना









