प्रतिनिधी /पणजी
अमेरिकन ब्रू क्राफ्टस् या कंपनीने नुकतीच आपली विविध दर्जेदार उत्पादने गोव्याच्या बाजारपेठेत दाखल केली आहेत. देशविदेशातील पर्यटकांसाठी गोवा हे ’सुट्टी आणि पार्टी स्थळ’ म्हणून सर्वाधिक पसंतीचे राज्य असल्यामुळेच आमची उत्पादने दाखल करण्यासाठी गोव्याची निवड केली, असे कंपनीचे संचालक सत्य शिवा अथी यांनी सांगितले.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरी नागेंद्र त्यायी यांचीही उपस्थिती होती.
काकीनाडा आंध्रप्रदेश आणि तेलंगाना येथे जर्मन तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा दोन अत्याधुनिक प्रकल्पांमध्ये उत्पादन करण्यात येते. निर्मिती प्रक्रियेदरम्यान उत्पादनाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड होणार नाही याची विशेष दक्षता बाळगण्यात येते. उत्पादनाची उत्कृष्ट चव सुनिश्चित करण्यासाठी काळजीपूर्वक निवडलेल्या कच्चा मालाचा दर्जाही कठोर संशोधनातून जपला जातो, असे अथी यांनी पुढे सांगितले.
देशातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ असलेल्या गोव्याच्या बाजारपेठेत अधिकाधिक उत्पादनांचा समावेश करणे हे आमचे ध्येय आहे. त्याद्वारे गोव्यास भेट देणाऱया पर्यटकांना आमची उत्पादने हमखास पसंतीस उतरतील व गोवा सोडताना एक अतुलनीय, सर्वोत्तम आणि सर्वात संस्मरणीय अनुभव घेऊन ते आपल्या गावी परततील असा विश्वास अथी यांनी व्यक्त केला.








