वृत्तसंस्था/पॅरिस
2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पुरूषांच्या बास्केटबॉल या क्रीडा प्रकारात अमेरिकेने सर्बियाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता सुवर्णपदकासाठी अमेरिकेची लढत फ्रान्सबरोबर होणार आहे.
या क्रीडा प्रकारातील उपांत्य फेरीच्या सामन्यात अमेरिकेने सर्बियाचा 95-91 अशा चार गुणाच्या फरकाने पराभव करत अंतिम फेरी गाठली. अमेरिका संघातील लिब्रॉन जेम्सने दर्जेदार कामगिरी केली. मध्यंतरापर्यंत अमेरिकेला या लढतीत 11 गुणाची पिछाडी होती. गेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेने फ्रान्सचा 87.82 अशा पाच गुणांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली होती. आता 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत अमेरिकेने पुन्हा अंतिम फेरी गाठली असून सुवर्णपदकासाठी त्यांची चिवट लढत फ्रान्सबरोबर होणार आहे. सर्बियातर्फे मध्यंतरापर्यंत बोगडेनोव्हीक याने 20 गुण मिळविले होते. सामन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये केवळ अमेरिकेने 6 गुण मिळविले होते. एकवेळी सर्बियाचा संघ 78-67 असा आघाडीवर होता. पण त्यानंतर अमेरिकेने दर्जेदार खेळ करुन सर्बियाचे आव्हान संपुष्टात आणले.









