विमानातील प्रवाशांना वाचविण्यास यश
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या डेनवर आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानात अचानक आग लागली. ही दुर्घटना अमेरिकन एअरलाइन्सच्या विमानासोबत घडली आहे. लँडिंगनंतर विमानाला त्वरित आग लागल्याने प्रवाशांना इमर्जन्सी स्लाइडद्वारे बाहेर काढण्यात आले. पूर्ण विमानात आग फैलावेपर्यंत सर्व प्रवासी आणि चालक दलाच्या सदस्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. विमानात 172 प्रवासी आणि चालक दलाचे 6 सदस्य होते. या घटनेत कुणीच जखमी झाले नाही.
संबंधित विमान कोलोराडो स्प्रिंग्स येथून डलास फोर्ट वर्थ येथे जात होते. विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड जाणवल्यावर वैमानिकाने विमान डेनवरच्या दिशेने वळविले होते. बोइंग 737-800 विमान सुरक्षितपणे लँड करविण्यात आले, परंतु गेटच्या दिशेने ते सरकू लागताच याच्या एका इंजिनात आग लागली. अशा स्थितीत विमानतळावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने पावले उचलत इमर्जन्सी स्लाइडचा वापर करत सर्वांना बाहेर काढले.
सोशल मीडियावर विमानाला आग लागण्याच्या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. विमानाला कोणत्या कारणामुळे आग लागली हे स्पष्ट झालेले नाही. एअरलाइनने चालक दलाचे सदस्य आणि अन्य कर्मचाऱ्यांचे बचावकार्यासाठी आभार मानले आहेत. चालक दलाने घटनेला योग्यप्रकारे सामोरे जात सर्वांची सुरक्षा केल्याचे एअरलाइनने म्हटले आहे.









