संयुक्त राष्ट्रसंघात पहिल्यांदाच रशियाच्या निंदेस नकार : मतदानातही दिली साथ : भारत राहिला अनुपस्थित
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेने मंगळवारी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत युक्रेनकडून सादर प्रस्तावाच्या विरोधात अन् रशियाच्या समर्थनार्थ मतदान केले आहे. युक्रेनने रशियासोबतच्या युद्धाला 3 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त संयुक्त राष्ट्रसंघात एक प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावात रशियन हल्ल्याची निंदा करणे आणि युक्रेनमधून रशियन सैन्य तत्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. अमेरिकेने स्वत:च्या जुन्या धोरणांच्या उलट सहकारी युरोपीय देशांच्या विरोधात जात या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच अमेरिका आणि इस्रायलने युक्रेनच्या विरोधात मतदान केले आहे.
तर भारत आणि चीन समवेत 65 देशांनी या मतदानात भाग घेतला नाही. प्रस्तावाचे समर्थन करणाऱ्या देशांमध्ये जर्मनी, ब्रिटन आणि फ्रान्स यासारखे प्रमुख युरोपीय देश सामील आहेत. हा प्रस्ताव 18 विरुद्ध 93 मतांनी संमत झाला आहे.
युक्रेनच्या प्रस्तावातील तीन प्रमुख मागण्या
-युक्रेनमधून रशियन सैन्याची तत्काळ माघार.
-युक्रेनमध्ये स्थायी आणि न्यायपूर्ण शांतता
-युद्धगुन्ह्यांसाठी रशियाचे उत्तरदायित्व
अमेरिकेचाही प्रस्ताव
अमेरिकेने देखील संयुक्त राष्ट्रसंघात 3 परिच्छेदांचा प्रस्ताव मांडला. यात रशियन हल्ल्याचा उल्लेख नव्हता. तसेच त्याची निंदाही करण्यात आली नव्हती. यात केवळ दोन्ही देशांमध्ये झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्यात आला होता. लढाई लवकर संपवून युक्रेन आणि रशिया यांच्यात स्थायी शांततेचे आवाहन करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अशाप्रकारचे प्रस्ताव युद्ध रोखण्यास अपयशी ठरले आहेत. हे युद्ध आता खूपच लांबत चालले आहे. युक्रेन आणि रशियासोबत अन्य ठिकाणी देखील लोकांना याची मोठी किंमत मोजावी लागत असल्याचे अमेरिकेच्या प्रतिनिधी डोरोथी कॅमिली शिया यांनी म्हटले आहे. तर आमच्या जुन्या सहकाऱ्याने आमच्या विरोधात मतदान केल्याने आम्ही नाराज आहोत असे युरोपियन प्रतिनिधींनी म्हटले.
ट्रम्प अन् झेलेंस्कीदरम्यान वाक्युद्ध
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांच्यात वाक्युद्ध पेटले असताना हा प्रकार घडला आहे. ट्रम्प यांनी एका सोशल मीडिया पोस्टमध्ये झेलेंस्की यांना एक किरकोळ कॉमेडियन अन् निवडणुकीशिवाय झालेला हुकुमशहा संबोधिले होते. तर ट्रम्प हे चुकीच्या माहितीसोबत गैरसमजुतीत जगत असल्याचे प्रत्युत्तर झेलेंस्की यांनी दिले होते.
अमेरिकेने परत मागितला निधी
ट्रम्प यांनी युक्रेनला युद्धासाठी देण्यात आलेला निधी परत मागितला आहे. मी केवळ रक्कम किंवा त्याच्या बदल्यात काही सुरक्षा मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. आमच्या पैशांच्या मदतीच्या बदल्यात युक्रेनने आम्हाला काही तरी द्यावे. आम्ही दुर्लभ खनिजं अन् तेल मागत आहोत, यातील जे काही देता येईल ते युक्रेनने आम्हाला द्यावे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिकेकडून मिळालेल्या 500 अब्ज डॉलर्सला आम्ही कर्ज मानत नाही, आम्ही मदतीला कर्ज मानत नसल्याचे झेलेंस्की यांनी नमूद केले होते.









