फाइव्ह आइजमधून बाहेर काढण्याचा घेणार निर्णय
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
कॅनडाला फाइव्ह आइज या हेरगिरीशी संबंधित आघाडीतून बाहेर काढले जाऊ शकते. व्हाइट हाउसच्या अधिकाऱ्यांनी कॅनडाला फाइव्ह आइजच्या आघाडीतून वगळले जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. अमेरिकेने हा निर्णय घेतल्यास कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याकरता हा मोठा झटका ठरणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय सल्लागार पीटर नवारो यांनी यासंबंधीचा दावा केला आहे.
फाइव्ह आइज इंटेलिजेन्स-शेअरिंग नेटवर्कमधून कॅनडाला वगळण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. तर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी कॅनडावर भरभक्कम शुल्क लादण्याची धमकी दिली होती. तसेच शुल्क टाळायचे असेल कॅनडाला अमेरिकेचा 51 वा प्रांत व्हावे लागेल असे ट्रम्प यांनी सुनावले होते.
फाइव्ह आइज एक इंटेलिजेन्स शेअरिंग नेटवर्क असून जी गुप्तचर माहितींना परस्परांमध्ये शेअर करते. याचे पाच सदस्य असून यात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन आणि न्युझीलंड सामील आहे. या हेरगिरी आघाडीला जगातील सर्वात शक्तिशाली गुप्तचर नेटवर्क मानले जाते. तत्कालीन सोव्हियत महासंघाच्या विरोधात याची स्थापना करण्यात आली होती. फाइव्ह आइजमधून कॅनडाला हटवून त्याच्या विरोधात दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न ट्रम्प करत असल्याचा खुलासा नवारो यांनी केला आहे.
गांभीर्याने विचार
कॅनडाला फाइव्ह आइजमधून वगळण्याच्या निर्णयासंबंधी ट्रम्प प्रशासनाचे अधिकारी गांभीर्याने विचार करत आहेत. कॅनडाला अमेरिकेचा 51 प्रांत करण्याची घोषणा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी ‘वास्तविक’ असल्याचे वक्तव्य ट्रुडो यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. डोनाल्ड ट्रम्प हे कॅनडाच्या अमेरिकेतील विलीनीकरणावरून गंभीर आहेत, ते केवळ ट्रुडो यांना चिथावणी देण्यासाठी अशाप्रकारची वक्तव्यं करत नसल्याचे व्हाइट हाउसचे माजी रणनीतिकार स्टीव बॅनन यांनी नमूद केले आहे.
अत्यंत शक्तिशाली संघटना
खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येचे आरोप जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केले होते. या आरोपाकरता फाइव्ह आइजकडूनच माहिती मिळाल्याचा दावा ट्रुडो यांनी केला होता. तर न्युझीलंडच्या संघाने 2021 मध्ये पाकिस्तानात क्रिकेट सामने खेळण्यास अचानक नकार दिला होता आणि पूर्ण संघ तातडीने पाकिस्तानातून बाहेर पडला होता. त्यावेळीही फाइव्ह आइजकडून संभाव्य दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आल्याचे मानले गेले होते. फाइव्ह आइज अनेक दशकांपासून अत्यंत शक्तिशाली इंटेलिजेन्स शेअरिंग नेटवर्क असून यात पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणा सक्रियपणे काम करतात. फाइव्ह आइजकडून मिळालेल्या माहितींवरुन देखील हे सर्व देश अत्यंत संवेदनशील असतात. या संघटनेने चीन आणि रशियासंबंधी देखील अत्यंत महत्त्वाची माहिती जमविलेली आहे.









