100 वर्षांपासून हेच काम : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ते जगाला युद्धाला लोटुन अमेरिका पैसे कमावत असल्याचे म्हणताना दिसून येतात. अमेरिका जगभरात युद्ध भडकवित असते. अमेरिका या संघर्षातून पैसे कमावत असते असे आसिफ यांनी म्हटले आहे.
स्वत:च्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला बळकट करण्यासाठी अमेरिका जगात कुठेही संघर्ष भडकवत असते, युद्ध भडकवत राहते आणि मग त्यात स्वत:ची शस्त्रास्त्रs विकून पैसे कमाविते. युद्धादरम्यान अमेरिका दोन्ही बाजूच्या वतीने भूमिका बजावते आणि अशाप्रकारे ते स्वत:च्या संरक्षण उत्पादन क्षेत्राला जागतिक अस्थिरतेच्या स्थितीत लाभ मिळवून देत असल्याचा आरोप ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.
अमेरिकेवर भडकले
जगात प्रत्येक ठिकाणी अमेरिका युद्ध भडकवत आहे. बहुधा मागील 100 वर्षांपासून अमेरिका हे करत आहे. अमेरिकेने 260 युद्ध लढली आहेत, तर चनीने 3 युद्ध लढली आहेत. अमेरिका अद्याप यातून पैसे कमावत आहे, सैन्य उद्योग त्यांच्या जीडीपीचा एक मोठा हिस्सा आहे, याचमुळे अमेरिकेला युद्धात सामील व्हावे लागते, अमेरिका इतर देशांमध्ये संघर्ष निर्माण करते, दोन देश लढू लागल्यावर अमेरिकेच्या कमाईत वाढ होते. अमेरिकेने पॅलेस्टाइन, सीरिया, इजिप्त आणि लीबियात असेच केले आहे, हे सर्व श्रीमंत देश होते, परंतु आता युद्धामुळे हे दिवाळखोर ठरले आहेत आणि अमेरिकेने मोठी कमाई केली असल्याचे ख्वाजा आसिफ यांनी म्हटले आहे. आसिफ यांचा हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही.









